पुणे : वडापाव खाण्याची इच्छा तरुणाच्या उठली जिवावर, काढून घेतलेले पैसे परत मागितल्याने कोयत्याने वार | पुढारी

पुणे : वडापाव खाण्याची इच्छा तरुणाच्या उठली जिवावर, काढून घेतलेले पैसे परत मागितल्याने कोयत्याने वार

पुणे, पुढारी वृत्तसेवा : भूक लागल्यानंतर हातगाडीवर वडापाव खाण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलाला रस्त्यात गाठून त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागून जबरदस्तीने त्याच्या खिशातून 500 रुपये काढून घेतले. मुलाने पैसे परत मागितल्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार केल्याने तीन सराईतांवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहाल शिंदे ऊर्फ नेहल्या ताज शेख (दोघेही रा. मित्रमंडळ यशोदीप चौक, वारजे), लंगडा अभ्या (रा. अमर भारत सोसायटी, वारजे) या सराइतांवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितीन बाबूराव जाधव (वय 17, रा. पाण्याच्या

टाकीमागे, सहयोगनगर, सर्वेनंबर 48, वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा नितीन आणि संशयित आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दि. 18 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नितीनला भूक लागल्याने तो त्याच्या घराजवळील सहयोगनगरमधील वडापावच्या गाडीवर वडापाव खाण्यासाठी चालला होता. त्यावेळी तिघा संशयित आरोपींनी त्याला रस्त्यात गाठले. तिघांनी त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करत त्याच्या खिशातून जबरदस्तीने पाचशे रुपये काढून घेतले.

नितीनने त्यांच्याकडे पैशाची परत मागणी केली असता नेहाल शिंदे याने ‘थांब आता याच्याकडे बघतोच’, असे म्हणत शर्टाच्या पाठीमागे ठेवलेला लोखंडी कोयता काढत त्याच्या हातावर वार केले. नितीनने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले.
त्यावेळी शिंदे याने त्याच्या हातातील कोयता लोकांना दाखवून कोणी जवळ आला तर बघून घेण्याची धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बापू रायकर हे तपास करत आहेत.

Back to top button