उत्तर महाराष्ट्र

नाशिक : दुभाजकांवर जाहिरातबाजी कराल तर खबरदार, मनपा आयुक्तांचे कारवाईचे आदेश

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबक नाका ते गडकरी चौकादरम्यान रस्त्या – दुभाजकांवर जाहिरातबाजी करून विद्रूपीकरण करणार्‍या संबंधित प्रायोजक तथा विकासकावर शहर विद्रूपीकरण कलमांतर्गत कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी दिले आहेत. जाहिरात फलकधारकास नोटीस बजावली जाणार असून, त्यानंतरही दुरुस्ती न झाल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे.

महापालिकेच्या माध्यमातून शहरातील वाहतूक बेट, दुभाजकांचा प्रायोजकांच्या माध्यमातून विकास केला जात आहे. यासाठी महापालिकेने शहरातील 132 वाहतूक बेट तसेच दुभाजकांची यादीही तयार केली असून, त्यातील काही वाहतूक बेट, दुभाजकांचा विकास करण्यात आला आहे. वाहतूक बेट, दुभाजक विकसित करणार्‍या प्रायोजकास त्या वाहतूक बेट वा दुभाजकावर आपल्या फर्मची जाहिरात करणे अथवा नामफलक उभारण्याची मुभा आहे. मात्र, काही प्रायोजक दुभाजक विकसित केल्यानंतर त्यावर जाहिरातींच्या माध्यमातून पैसा उकळत असल्याचे समोर येत आहे. दुभाजकांवर क्षमतेपेक्षा अधिक जाहिराती लावल्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत असून, अपघात घडत आहेत.

त्र्यंबक रोड ते गडकरी चौका दरम्यान दुभाजकांवर संबंधित प्रायोजकाने मोठ्या प्रमाणावर जाहिरातींचा मारा केल्याने या प्रायोजकाविरोधात शहर विद्रूपीकरण कलमांतर्गत कारवाई करण्याचे आदेश आयुक्त पवार यांनी सोमवारी (दि.6) दिले. या प्रायोजकास, जाहिरातदारास नोटीस बजावली जाणार असून, त्यानंतरही जाहिराती काढल्या न गेल्यास मात्र गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जाहिरातीचा आकार निश्चित
वाहतूक बेट तसेच दुभाजकांवरील जाहिरातींचा आकार व जागेसाठी महापालिका आयुक्त पवार यांनी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार आता दुभाजकांवर दोन फूट रुंद, व एक फुटापेक्षा अधिक उंचीचा फलक लावता येणार नाही. प्रत्येक फलकात 20 फुटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT