धुळे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या वतीने देशभर आधारकार्ड नोंदणी मोहीम राबविण्यात येऊन बहुतांश नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, नवी दिल्ली यांचेकडील 9 नोव्हेंबर, 2022 मधील अधिसूचनेत नमुद केलेल्या कागदपत्रांच्या अद्यावयत नियमावलीनुसार दहा वर्ष पूर्ण झालेल्या आधार कार्डधारकांनी त्यांचे आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे अद्यावत करणे आवश्यक आहे.
धुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांच्या आधार नोंदणीस १० वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. नागरिकांनी आधारकार्ड काढताना आपल्या ओळखीचा पुरावा व रहिवासी पुरावा संबंधीत कागदपत्रे ऑनलाईन सादर केलेली नाहीत, अशा नागरिकांनी आधारकार्ड अद्यावत करण्यासाठी आधारकार्डशी संबंधित कागदपत्रे आधार केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन अद्यावत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. कागदपत्रे ऑनलाईन अद्यावत करण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.
स्थानिक ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, सरपंच, नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनी याकरिता सहभाग घेऊन आधार नोंदणीस दहा वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या आधार कार्डधारकांना कागदपत्रे ऑनलाईन अद्यावत करुन घेण्यासाठी जागृत करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले आहे.