पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: शहरातील प्रवाशांना एसटी अथवा प्रशासनाबाबत काही तक्रारी असल्यास आता थेट अधिकार्यांशी संपर्क साधता येणार आहे. यासाठी आगारात अधिकार्यांच्या संपर्क क्रमांकाचा बोर्ड लावण्यात येणार आहे. अशी माहिती वल्लभनगर एसटी आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक पल्लवी पाटील यांनी दिली. एस.टी. ची सेवा दर्जेदार आणि लोकाभिमुख बनविण्यासाठी प्रशासन आग्रही असून प्रवासी व अधिकारी यांचा परस्परांशी सुसंवाद रहावा. यासाठी प्रशासनाने हा उपक्रम राबविला आहे.
एसटीचा दूरध्वनी सतत व्यस्त :
प्रवाशांना काही समस्या अथवा माहिती हवी असल्यास एसटीच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला जातो. मात्र एकाच क्रमांकावर सतत विचारपूस सुरू असल्याने तो क्रमांक सतत व्यस्त असतो. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर योग्य माहिती मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होते. आता सर्व अधिकार्यांशी संपर्क करता येणार असल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय टळली आहे.
प्रवाशांना वेळेवर मिळणार मदत :
पिंपरी ते दापोली जाणार्या एसटीमध्ये शनिवारी स्पार्क झाल्याने निजामपूरच्या मार्गात एस.टी. बंद पडली. स्पार्क झाल्याने सर्व प्रवाशांना 12 ते 3 असे तीन तास एस.टी.च्या बाहेर रस्त्यावर उन्हात ताटकळत थांबावे लागले. यानंतर प्रवाशांपैकी एकाने वल्लभनगर आगारातील अधिकार्यांशी संपर्क साधला. त्यामुळे शेजार्याच्या माणगाव डेपोतील टेक्निशियन हजर झाल्यावर त्याने त्रुटी दूर केल्या. अशाप्रसंगी प्रवाशांजवळ अधिकार्यांचे दूरध्वनी क्रमांक असल्यास होणारी गैरसोय टाळता येणार आहे.