उत्तर महाराष्ट्र

लासलगाव बाजार समितीत 1695 कोटींची उलाढाल, शेतमालाची विक्रमी आवक

गणेश सोनवणे

नाशिक (लासलगाव) वार्ताहर : कृषी प्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशाला कोरोना काळात शेतमालाने तारले असल्याचे दिसून आले होते आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उलाढालीत लक्षणीय वाढ झाल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे. आशिया खंडातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या वर्षभरात १ कोटी १ लाख ६२ हजार क्विंटल कांदा व इतर शेतमालाची विक्रमी आवक झाली असून त्यातून १६९५ कोटी २२ लाख ८० हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बाजार समितीच्या उलाढालीत ३८१ कोटींची वाढ झाली आहे. तर सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ८५ लाख ३४ हजार क्विंटल कांदा आवक होऊन फक्त कांदा विक्रीतून १३०५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३६६ कोटींनी उलाढालीत वाढ झाली आहे.

कांद्याची विश्वसनीय बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजार समिती ओळखली जाते. देशभरातील कांदा दर हे लासलगाव बाजार समिती वरून ठरतात. कांद्या संदर्भात काहीही निर्णय झाला तर संपूर्ण देशाचे लक्ष लासलगाव कडे लागलेले असते. आपल्या पारदर्शक कामाच्या जोरावर लासलगाव बाजार समितीने चांगली कामगिरी करत १६९५ कोटी रुपयांची उलाढाल केली. अमावस्या आणि शनिवार असे वर्षातील ६० दिवस कामकाज वाढल्याने उलाढालीत विक्रमी वाढ झाली आहे. तर कांदा विक्रीतून बाजार समितीला १३०५ कोटी रुपयांचे उलाढाल मिळाल्याची माहिती पहिल्या महिला सभापती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

बाजार समितीत पारदर्शक आणि विश्वासार्ह कामकाजामुळे शेतकऱ्यांची लासलगाव बाजार समितीला पहिली पसंदी असते. कांदा व इतर शेतमालाचे पैसे त्वरित मिळत असल्यामुळे लासलगाव बाजार समितीत कांदा, धान्य, भाजीपाला, टोमॅटो, डाळींब सह आदी शेतमालाची उलाढाल वाढली आहे. सभापती सुवर्णा जगताप यांच्या पुढाकाराने गेल्या ७५ वर्षांपासून अमावस्येला बंद असलेले कांदा लिलाव सुरू करण्यात आले आहे तसेच शनिवारी देखील कांदा लिलाव सुरू राहणार असल्याने यंदा बाजार समितीचे उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

आशिया खंडातील सर्वात नावाजलेली बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. सर्वात जास्त आवक व सरासरी मध्ये सर्वाधिक भाव मिळवून देणारी बाजार समिती अशी गणना लासलगाव बाजार समितीची शेतकर्यांमध्ये आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याबरोबर धान्य, भाजीपाला, टोमॅटो, डाळींब आदी मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने बाजार समितीच्या आवारात देखील कमी पडू लागले आहे. मका व सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात येथे पाहायला मिळत आहे. चवीला उत्कृष्ट असलेला जीआय मानांकन मिळालेला लासलगावचा कांदा जगातील ७४ देशात निर्यात केला जातो. देशाला कांदा निर्यातीतून देखील मोठे परकीय चलन मिळत आहे. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या आर्थिक वर्षात देशाला कांदा निर्यातीतून २९७३ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.

मागील ६ वर्षातील शेतमाल आवक आणि उलाढाल

सन २०१५-१६ -४० लाख ७६ हजार क्विंटल -५३२ कोटी

सन २०१६-१७ -५३ लाख ८० हजार क्विंटल-४१७ कोटी

सन २०१७-१८ -६८ लाख ८२ हजार क्विंटल-१०९८ कोटी

सन २०१८-१९ -७६ लाख ९२ हजार क्विंटल -६४३ कोटी

सन २०२०-२१ -८१ लाख ४३ हजार क्विंटल -१३१४ कोटी

सन २०२१-२२ -१ कोटी १ लाख ६२ हजार क्विंटल -१६९५ कोटी

मागील ५ वर्षातील कांदा उलाढ़ाल

सन २०१६-१७ -२३६ कोटी

सन २०१७-१८ -८३१ कोटी

सन २०१८-१९ -४१६ कोटी

सन २०२०-२१ -९३९ कोटी

सन २०२१-२२ -१३०५ कोटी

बाजार समितीत पारदर्शक आणि विश्वासार्ह कामकाजामुळे शेतकऱ्यांची लासलगाव बाजार समितीला पहिली पसंदी असते. शेतकऱ्यांचा लासलगाव बाजार समितीवर विश्वास असल्याने फळे आणि भाजीपाला केंद्राने नियमन मुक्त असूनही शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात लासलगाव बाजार समितीत होत आहे. रोख चुकवती, जलद वजनमाप, पारदर्शक व्यवहार यामुळे शेतकरी लासलगाव बाजार समितिला प्राधान्य देतात. यामुळेच लासलगाव बाजार समितीने सन २१-२२ या आर्थिक वर्षात १६९५ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. शासकीय निर्देशांची अंमलबजावणी करून व व्यापारी वर्गाशी समन्वय साधून जास्तीत जास्त दिवस कामकाज केले. यामुळेच उलाढाल वाढली आहे. – सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT