Prashant Jagtap Resignation Buzz Grows: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याच्या हालचालींमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे निष्ठावान मानले जाणारे प्रशांत जगताप राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्र येण्याला जगताप यांचा विरोध असल्यामुळेच हा निर्णय घेतला जात असल्याचं बोललं जात आहे.
या चर्चांमुळे शरद पवार गटात खळबळ उडाली असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र राजीनाम्याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. “प्रशांत जगताप यांचा कोणताही राजीनामा माझ्याकडे आलेला नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
प्रशांत जगताप यांनी काल मुंबईत सुप्रिया सुळे आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीत जगताप यांची नेमकी भूमिका समजून घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण जगताप यांनी जर राष्ट्रवादी सोडली, तर पुण्यात पक्षाला मोठा फटका बसू शकतो. याचा थेट परिणाम आगामी महानगरपालिका निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत जाण्याबाबत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांत वेगवेगळे मतप्रवाह असल्याचंही स्पष्ट होत आहे. काही नेते एकत्र येण्याच्या बाजूने असताना, काहींना यामुळे पक्षाची ओळख आणि संघटनात्मक ताकद कमी होईल, अशी भीती वाटत आहे.
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. अमोल मिटकरी यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''अजितदादांच्या पुण्याईने विविध पदांवर पुण्यात शेखी मिरवणाऱ्या पुण्याच्या माजी महापौराला कोर कमिटी व ज्येष्ठ नेत्यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयाने चांगलाच जुलाब लागलाय.मागच्या काळात राजकीय संन्यास घेणार, राजीनामा देणार, अशा वल्गना करत निष्ठावंत वगैरे बिरुदावली चढवत भावी खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या उपटसुंभाचा पीळ स्वभावाप्रमाणे कायम राहणार यात शंका नाही.खरच पुण्यात स्वतःच अस्तित्व दाखवायची खुमखुमी असेल तर स्वत:चा एखादा पक्ष काढ की बाबा #पुण्याचाभावी “खाज”दार'' या पोस्टमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद अधिकच चिघळल्याचं दिसत आहे.
सध्या तरी प्रशांत जगताप यांचा राजीनामा अधिकृतरीत्या समोर आलेला नाही. भेटीतून तोडगा निघतो का, की मतभेद वाढतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुण्यातील राजकारण आणि आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेससाठी पुढचे काही दिवस निर्णायक ठरणार आहेत.