मुंबई

लग्नासाठी तगादा लावणार्‍या प्रेयसीला भाईंदर खाडीत ढकलून केली हत्या

Shambhuraj Pachindre

मुंबई : पुढारी वृत्तसेवा कायम लग्नासाठी तगादा लावत असल्याने एका प्रियकराने 20 वर्षीय प्रेयसीला भाईंदर खाडीत ढकलून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मलबार हिल पोलिसांनी 21 वर्षीय आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

मलबार हिलमधील भाऊसाहेब हिरे मार्ग परिसरात रहात असलेली अंकिता शिवगण (20) ही बेपत्ता झाल्याची तक्रार 31 जुलैला तिचा चुलतभाऊ चंद्रकांत शिवगण याने केली होती. विरार पूर्व परिसरात रहात असलेला अभिषेक सरफरे हा 21 वर्षीय तरुण अंकीताच्या सतत संपर्कात असल्याची माहिती मोबाईल विश्लेषणातून हाती लागली. पोलिसांनी अभिषेकला ताब्यात घेऊन अंकिताबद्दल चौकशी केली. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. खाक्या दाखवताच त्याने अंकीताच्या हत्येची कबुली दिली.

अभिषेक आणि अंकिता 2016 मध्ये गावी असताना त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. अंकिता लग्न करण्यासाठी वारंवार तगादा लावत होती. मात्र सध्या लग्न करण्याची इच्छा नसल्याने अभिषेक टाळाटाळ करत होता. याचवरुन दोघांमध्ये खटके उडत होते. अंकिताने एका दिवशी अभिषेकला धमकी दिली. त्याचाच राग मनात धरुन अभिषेकने तिचा काटा काढला.

31 जुलैला अभिषेकने अंकीताला कॉल करुन ग्रँटरोड रेल्वे स्थानकावर बोलावले. लोकलने बोरीवली रेल्वे स्थानकात घेऊन गेला. पुढे दोघेही बसने भाईंदर रेल्वे स्थानकावर गेले. तेथे अभिषेकने अंकीताला भाईंदर खाडी पाहू म्हणून रुळांवरून चालत नेले. भाईंदर खाडीवरील रेल्वे पुलावर पोहचल्यानंतर ती बेसावध असता तिला खाडीत ढकलून दिले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT