

पुणे; पुढारी वृत्तसेवा: व्यवसायात भागीदारी, नफा देण्यासाठी तब्बल 10 कोटी 17 लाख वेळोवेळी घेऊन वडिलांच्या निधनानंतर मात्र ही रक्कम परत देण्यास नकार देत फसवणूक करणार्या चौघांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे. पी. रविकुमार, आर. सुवर्णा (तिघेही रा. आंध— प्रदेश) आणि श्री. शिवानंद हत्ती (रा. जत, सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हर्षीत दिनेशकुमार गांधी (32, रा. रमार अॅव्हेन्यू, इम्प्रेस गार्डनच्या पाठीमागे, ताराबाग रोड, सोपानबाग, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. 2019 मध्ये फिर्यादीचे वडील दिनेशकुमार गांधी यांचे निधन झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2006 ते 2018 दरम्यान संशयित आरोपींनी फिर्यादींचे वडील दिनेशकुमार इंदरचंद गांधी यांचा विश्वास संपादन केला.
त्या आधारे त्यांनी कन्स्ट्रक्शन ऑफ कॉटन इंडस्ट्री अॅण्ड ग्रोथ ऑफ कॉटन इंडस्ट्रीमध्ये नफा देण्याचे, तर श्रीश्री रामा इंडस्ट्रीजमध्ये भागिदारी देण्याच्या बहाण्याने वेळोवेळी व्यवसायासाठी कर्ज म्हणून तब्बल 10 कोटी 17 लाख घेतले. सुरुवातीला फिर्यादीच्या वडिलांना नफा स्वरूपात 1 कोटी 58 लाख दिले. 2019 मध्ये फिर्यादी यांचे वडिलांचे अचानक निधन झाल्यानंतर फिर्यादी यांनी संशयीत आरोपींकडे पैसे मागितले असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तसेच फिर्यादीचा नंबर ब्लॉक करून त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी हर्षीत यांनी वानवडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत फिर्याद दिल्यानंतर सर्व संशयीत आरोपींवर फसवणूक, अपहार, धमकावणे, संगणमत करणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.