मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात राज्यात निर्बंध लावलेल्यामुळे दुकानदार, व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांना वेळ वाढवून देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तशी मागणीही मंत्र्यांनी केली. मात्र, तूर्त निर्बंध 'जैसे थे' राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे आणखी काही दिवस तरी निर्बंधांपासून दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. महिनाभरात सरासरी दिवसाला सात ते आठ हजार रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंधांमधून काही प्रमाणात सूट मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
अधिक वाचा
टास्क फोर्सनेदेखील निर्बंध शिथिल करण्याबाबत शिफारस केली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ बैठकीकडे लागले होते.
बैठकीत अनेक मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्याबाबत होत असलेल्या मागणीची माहिती देत त्यावर निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केल्याचे समजते.
मात्र, रुग्णसंख्या कमी झाली असली, तरी घाई करून चालणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील 92 टक्के रुग्ण 10 जिल्ह्यांत असून, उरलेल्या 26 जिल्ह्यांत 8 टक्के रुग्ण असल्याची माहिती राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.
गेल्या एक महिन्यात 7 ते 8 हजारच्या घरात रुग्ण दररोज वाढत आहेत; पण देशाच्या तुलनेत वाढीचा वेग कमी आहे, असे ते म्हणाले.
अधिक वाचा
लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, त्याबाबतही बैठकीत कुठलाही निर्णय झाला नाही.
राज्यभरात व्यापारीवर्ग कोरोना निर्बंधांविरोधात आक्रमक झाला आहे. त्यामुळे व्यापार्यांबाबत काही सकारात्मक निर्णय होऊ शकतो, अशी एक शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र, निर्बंधांमध्ये कोणतीही सूट देण्याचा निर्णय बुधवारी झालेला नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच त्याबाबत योग्य निर्णय घेतील, असे राजेश टोपे यांनी सांगितले
खासगी रुग्णालयांना उत्पादकांकडून 25 टक्के लस घेता येऊ शकते, तो वाटा राज्याला कसा जास्तीत जास्त मिळेल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
सध्या राज्याला लसींचा पुरवठा कमी आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात 4 कोटी डोस उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात दररोज 10 ते 15 लाख लसीकरण होऊ शकते; मात्र आपल्याला दिवसाला केवळ 6 ते 7 लाख डोस मिळतात, अशी माहितीही टोपे यांनी दिली.
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड आणि अहमदनगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील रुग्णवाढ कशी रोखायची, याची चिंता सरकारला आहे.
शाळा सुरू होण्याबाबत जो प्रोटोकॉल लागतो, तो तयार नाही. त्यामुळे शाळा लगेच सुरू होतील अशी सध्या शक्यता दिसत नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या निर्णयाला मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली आहे.
गेल्या आठ दिवसांत डॉक्टरांच्या 899 जागा भरण्यात आल्या आहेत. पुढच्या काही दिवसांत आणखी 1 हजार जागा भरल्या जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पर्यटनस्थळे आणि बाजारपेठांत मोठी गर्दी करत आहेत.
या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा. अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना दिल्या असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.
राज्यात लोक नियम पाळणार नसतील तर निर्बंध कडक करावे लागतील, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबतच्या बैठकीत कोणता निर्णय घेतात, याबाबतही उत्सुकता आहे.
https://youtu.be/pwbK_–MP4s