मुंबई

उद्धव ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड झाली चर्चा

अमृता चौगुले

उद्धव ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांच्या काही वेळेसाठी बंद दाराआड भेट झाली. या भेटीमुळे या दोन मोठ्या नेत्यांमध्ये नेमकी काय बातचीत झाली याचीच दिवसभर चर्चा रंगली होती.

उद्धव ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी भेट झाली. बाहेर केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी बंद दाराआड पंधरा मिनिटे भेट झाल्याने एकच राजकीय चर्चा सुरू झाली.

ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली होती. ही बैठक संपल्यावर अन्य नेत्यांची निघण्याची लगबग सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस,विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सह्याद्री अतिथीगृहातील एका मोकळ्या हॉलमध्ये शिरले. कुणालाही आत सोडू नका, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. दरेकर पाचच मिनिटात बाहेर पडले. त्यानंतर फडणवीस आणि ठाकरे यांच्यात सुमारे पंधरा मिनिटे बंद दाराआड बोलणे झाले. अशा भेटीचा तपशील अधिकृतपणे कधीच दिला जात नाही. तसा तो शुक्रवारीही देण्यात आला नाही.

विशेष म्हणजे शुक्रवारपासून राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला कोकणात पुन्हा सुरुवात झाली असतानाच एकमेकांवर आगपाखड करणारे शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही भाषा शुक्रवारीच काहीशी मवाळ झाली. शिवसेनेबरोबर भाजपाचे वैर नाही, मतभेद आहेत, असे सांगत पुन्हा युती होण्याबाबत सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केले आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही शुक्रवारी सकाळी नरमाईचा सूर लावत शिवसेना-भाजप मैत्रीचे दिवस आठवले.

राऊत यांनी तोफ डागली ती भाजपमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांवर. दोन्ही पक्षांमधला हिंदुत्वाचा धागा कायम असून भाजपमध्ये बाहेरून आलेले घुसखोर वातावरण खराब करीत आहेत, असे राऊत म्हणाले. त्यांच्याकडून होत असलेली बेताल विधाने भाजपची जुनीजाणती मंडळी कधीही करणार नाहीत, असेही राऊत यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT