मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अनिल देशमुखांचे वकील सीबीआयच्या अटकेत : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांना सीबीआयने अटक केली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) प्राथमिक चौकशी अहवाल लिक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.
याच प्रकरणात सीबीआयने सीबीआयमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांनाही अटक केली होती. सीबीआयने डागा यांना ट्रान्जिस्ट रिमांडवर दिल्लीमध्ये नेले आहे. दिल्लीतील सीबीआय न्यायालयात दोघांना हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा प्राथमिक चौकशीचा अहवाल फुटल्याची चौकशी सीबीआयने सुरू केली असून, याच संदर्भात देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील अॅड. आनंद डागा यांना बुधवारी सायंकाळी सीबीआयने ताब्यात घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 20 मिनिटे चौकशी करून दोघांना सीबीआयने रात्री सोडून दिले.
गौरव चतुर्वेदी यांच्यासोबतच देशमुख यांच्या कन्येला आणि सुनेलाही सीबीआयने ताब्यात घेतले. हे सर्व जण वरळीतील सुखदा या त्यांच्या राहत्या इमारतीतून बाहेर पडत असतानाच सीबीआयच्या पथकाने त्यांना अडवले आणि ताब्यात घेतले, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादीचे नते नवाब मलिक यांनी दिली.
अनिल देशमुख यांच्या प्राथमिक चौकशी अहवाल फुटीसंदर्भात सीबीआयने काल रात्री उशिरा सीबीआयचाच उपनिरीक्षक अभिषेक तिवारी याला अटक केली. या प्रकरणी दिल्ली आणि अलाहाबादेत छापे टाकले जात आहेत.
नागपूरच्या एका वकिलाचीही चौकशी केली जात असल्याचे सीबीआयने रात्री माध्यमांना मेसेज पाठवून कळवले.
परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली टार्गेटच्या आरोपांवरून अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. या आरोपांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयच्या चौकशी अधिकार्यांनी अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिली होती.
देशमुख यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हा सिद्ध करणारे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत.
सबब हे प्रकरण बंद करण्यात यावे, अशी शिफारस करणारा हा प्राथमिक चौकशी अहवाल चौकशी अधिकारी आर. एस. गुंजाळ यांनी सादर केल्यानंतरही सीबीआयने देशमुखांवर एफआयआर दाखल केला.
सीबीआयचा हा प्राथमिक चौकशी अहवाल गेल्या 29 ऑगस्ट रोजी फुटला आणि माध्यमांपर्यंत पोहोचल्याने सारेच चकित झाले.
या अहवालाचा इन्कार सीबीआयने केलेला नाही.
पुराव्यांच्या आधारेच देशमुखांवर एफआयआर दाखल केल्याचे निवेदन सीबीआयने प्रसृत केले.
मात्र, हा चौकशी अहवाल फुटलाच कसा याची चौकशी आता सीबीआयने सुरू केली असून त्यासाठीच देशमुखांचे जावई चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतले.
चतुर्वेदी आणि अन्य लोकांची 20 मिनिटे चौकशी करून त्यांना रात्री सीबीआयने सोडून दिले.
या अहवाल फुटीत सहभागी असल्याच्या संशयावरून सीबीआयचा उपनिरीक्षक अभिषेक तिवारी याला अटक करण्यात आली आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, देशमुख यांच्या वकिलांच्या टीमने सीबीआयमधील खालच्या अधिकार्यांना हाताशी धरून प्राथमिक चौकशीचा हवा तसा अहवाल मिळवल्याचा सीबीआयचा आरोप आहे.
हे ही वाचलं का?