नवाब मलिक म्हणाले देशमुखांना क्लीन चिट दिली की नाही हे सांगावे | पुढारी

नवाब मलिक म्हणाले देशमुखांना क्लीन चिट दिली की नाही हे सांगावे

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली असल्याच्या बातम्या आम्हाला प्रसार माध्यमांकडूनच कळत आहेत. सीबीआयनेच याबाबतचे स्पष्टीकरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी केली.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना मुंबईतील बार मालकांकडून दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला देशमुख यांनी सांगितले होते, असा आरोप त्यांनी या पत्रात केला होता. या आरोपप्रकरणी सीबीआय त्यांची चौकशी करीत आहे. सीबीआयने देशमुख यांना क्लीन चिट दिली असल्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे प्रकाशित झाली होती.

त्यावर नवाब मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली. सत्य काय आणि असत्य काय, याचा खुलासा सीबीआयने केला पाहिजे. त्यांचा प्राथमिक अहवाल सोशल मीडियावर फिरत आहे. हा अहवाल सीबीआयच्या फाईलमधील आहे, खात्यांतर्गत आहे की बनावट अहवाल व्हायरल झाला आहे हे जनतेला कळले पाहिजे, असे ते म्हणाले.

शासनकर्ते संपूर्ण सत्य कधीच सांगत नाहीत. त्यामुळे मीडियानेच ते शोधून काढले पाहिजे, असे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणातील सत्यही मीडियानेच समोर आणावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Back to top button