Zilla Parishad Elections Pudhari
मुंबई

Zilla Parishad Elections: जिल्हा परिषद निवडणुकांची धुरा पालकमंत्र्यांकडे

5 फेब्रुवारीला मतदान; दावोसहून परतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचारसभांचा सपाटा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील महापालिकांच्या रणसंग्रामापाठोपाठ 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे मतदान 5 फेब्रुवारीला होणार आहे. या मतदानाची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील पालकमंत्री आणि संपर्कमंत्र्यांवर प्रामुख्याने सोपवली जाईल, असे सूत्रांकडून कळते. दरम्यान, दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेला उपस्थित राहून परतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषदांसाठी प्रचार सभांचा सपाटा सुरू करणार आहेत.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या तीन विभागांत जेथे निवडणुका होणार आहेत; तिथे भाजपला मुख्य पक्ष व्हायचे आहे. तसेच, सत्तेतील अन्य पक्षांनाही स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी महानगरपालिकांची निवडणूक अत्यंत गांभीर्याने लढवली. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत विकेंद्रित धोरण स्वीकारले जाण्याची चर्चा सध्या आहे. कोकणपट्ट्यावरील उद्धव ठाकरेंचा प्रभाव कमी व्हावा, यासाठी भाजप आणि शिंदे गट प्रयत्न करेल यात वाद नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथेही जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आपले पाय भक्कमपणे रोवण्यासाठी या जिल्ह्यांकडे विशेष लक्ष देतील.

भाजपची नजर पश्चिम महाराष्ट्रावर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे या जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःची ताकद उभी करण्याच्या प्रयत्नात आहे. तेथे पालकमंत्री अथवा संपर्कमंत्री यापैकी एकाकडे जबाबदारी सोपविण्याचे भाजपचे धोरण आहे. पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार यांचीही ताकद मोठी असल्याने या निवडणुका कळीच्या ठरू शकतील. अशा परिस्थितीत स्थानिक नेतृत्वाने त्याची जबाबदारी घ्यावी, असा प्राथमिक विचार समोर आला आहे. मराठवाड्यातही तीव्र राजकीय संघर्ष दिसून येतो. तेथे भारतीय जनता पक्षाला शिवसेना शिंदे गटाच्या ताकदीबाबत चिंता आहे.

2029 मध्ये तेथे सत्ताधारी वेगवेगळे लढले तर शिंदे गट आव्हान देण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथेही उत्तमरीत्या लढण्यासाठी स्थानिकांनी पुढे यावे, असे धोरण ठरवले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसहून सुमारे सहा ते सात दिवसांनंतर परतल्यानंतर प्रचाराचे जे दिवस शिल्लक आहेत तेथे ते पालकमंत्र्यांच्या मदतीने प्रचाराची धुरा वाहतील.

अजित पवार सक्रिय

अजित पवार या संपूर्ण क्षेत्रात स्वतःची ताकद बळकट करण्यासाठी सक्रिय होणार आहेत. याकामी त्यांना त्यांचे चुलते शरद पवार यांचीही साथ लाभण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात शिवसेना शिंदे गटाने शिवसेना ठाकरे गटाला मोठे आव्हान दिलेले आहे. त्यामुळे तेथील शक्ती बळकट करण्यावर एकनाथ शिंदे लक्ष देणार असल्याचे समजते. या भागातील पंचायत समिती सदस्य बहुसंख्येने आपले असावेत, यावरही तेथील स्थानिकांचा जोर असेल. 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूक तयारीचा भाग म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जाते.

राजकीय पक्ष मंथन करणार

सध्या शेतीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि तिथे सरकारबद्दल काहीशी नाराजी असण्याची शक्यता आहे. यामुळेच या परिसरामध्ये नेमके काय करायचे, यावर राजकीय पक्ष आपापसात मंथन करणार आहेत. या भागात सत्तारूढ महायुतीची शक्ती मोठी आहे. मात्र, काँग्रेसनेही या जिल्हा परिषद निवडणुका मनावर घेतल्या असून, तेथे ते ताकदीने उतरतील. ठाकरे बंधूंचे पक्ष हे महानगरांच्या राजकारणात जास्त रस घेतात. त्यामुळे जिल्हा परिषदेत या दोन्ही भावांची मानसिक गुंतवणूक फारशी नसेल, असा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT