मुंबई : सुमारे अठरा कोटींच्या सोन्याचा अपहार करून एका कारागिराने पलायन केल्याची घटना झव्हेरी बाजार परिसरात घडली. माणिक मदन धला असे या कारागिराचे नाव असून त्याच्याविरुद्ध एल. टी. मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
यातील तक्रारदार बोरिवली परिसरात राहात असून ते ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा होलसेलमध्ये दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. माणिक हा त्यांचा परिचित कारागीर असून त्याचे झव्हेरी बाजार येथील दादीशेठ अग्यारी लेन, पहिल्या मजल्यावरील रुम क्रमांक वीसमध्ये एक वर्कशॉप आहे. त्यांनी त्याच्याकडून अनेकदा दागिने बनवून घेतले होते, दागिने दुरुस्तीसह पॉलिशसाठी दिले होते.
कामात हुशार असल्याने त्याच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. डिसेंबर 2025 रोजी त्यांनी त्याला अठरा कोटींचे 1470 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने दुरुस्तीसह पॉलिशसाठी दिले होते. मात्र ते दागिने दिलेल्या मुदतीत परत न करता माणिक हा वर्कशॉप बंद करून पळून गेला होता.
तीन महिने उलटूनही तो त्यांना सापडला नाही. त्यामुळे त्यांनी माणिकविरुद्ध एल. टी. मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अठरा कोटींच्या दागिन्यांचा अपहार करून ज्वेलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. माणिक हा मस्जिद बंदर येथे राहात असून तो त्याच्या गावी पळून गेल्याचे बोलले जाते. त्यामुळे एक टीम त्याच्या अटकेसाठी गावी जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.