Mumbai BMW Hit and Run
मुंबईतील हिट अँड रन प्रकरणातील संशयित मिहीर शहाला पोलिसांनी अटक केली आहे.  PUDHARI
मुंबई

वरळी हिट अँड रन : ७२ तासांनंतर फरार मिहिर शहाला अटक

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : वरळी हिट अँड रन प्रकरणातील फरार आरोपी मिहिर शहाला ७२ तासांनंतर अटक करण्यात आली आहे. मिहिरने आपल्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला रविवारी धडक दिली होती. यात एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तेव्हापासून तो फरार झाला होता. तर या प्रकरणात त्याच्या वडिलांना जामीन मिळाला आहे. मिहिर देश सोडून जाऊ नये, म्हणून पोलिसांनी लुकआउट नोटीसही जारी केली होती.

राजेश शहा यांना जामीन मंजूर

वरळी हिट अँड रन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेश शहा (Rajesh Shah) यांना जामीन मंजूर झाला आहे. अपघात प्रकरणी राजेश शहा यांची अटक बेकादेशीर असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. राजेश शहा (Sewri Court) यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच राजेश शाह यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कोर्टाने 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर राजेश शहा यांना जामीन मंजूर केला आहे.

उत्पादन शुल्क विभागाचीही कारवाई

वरळी हिट अँड रन प्रकरणात उत्पादन शुल्क विभागानेही कारवाई केली आहे. जुहूच्या व्हाईस ग्लोबल तापस बारला उत्पादन शुल्क विभागाने सील ठोकले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर बार सील करण्यात आल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितले. वरळी दुर्घटनेतील पहिला आरोपी मिहीर शहा याने त्याच्या चार मित्रांसोबत जुहू येथील व्हाईस गोलबल तापस बारमध्ये पार्टी केली होती.

मिहीर गेला होता बारमध्ये

अपघातापूर्वी रात्री ११ वाजून ८ मिनिटांनी मिहीर आणि त्याचे चार मित्र पबमध्ये गेले. तेथे त्यांनी जेवण केले आणि दारू प्यायली. पण मिहीरने दारू घेतलेली नव्हती, तो फक्त रेड बूल हे एनर्जी ड्रिंक प्यायला असा दावा पबच्या चालकाने केला आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने काही वृत्तवाहिन्यांच्या हवाल्याने दिली आहे.

असा झाला होता अपघात

अपघात रविवारी रात्री झाला होता. यामध्ये प्रदीप नखवा आणि त्यांच्या पत्नी कावेरी दुचाकीवर जात असताना मिहीरच्या कारने त्यांना उडवली होती. यात कावेरी यांना जवळपास दीड किलोमीटर फरपटत नेले होते, त्यात त्यांचा मृत्यू झाला. मिहीर दारू पिऊन गाडी चालवत होता, असा संशय आहे.

SCROLL FOR NEXT