नवी मुंबई : न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि लंडन येथील ओटू अरेना या नाट्यगृहांपासून प्रेरणा घेऊन सिडकोने नवी मुंबईत देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेन्मेंट अरेना उभारणीची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पाद्वारे जागतिक दर्जाची करमणूक खुली होऊन कलाकार, उद्योजक आणि स्थानिकांसाठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईचे जागतिक नकाशावरील स्थान अधिक बळकट होईल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, पर्यटनाला चालना, नवीन उद्योगांच्या संधींची निर्मिती होणार असून देशातील करमणूक, जागतिक कार्यक्रम आणि आभासी अनुभव प्रदान करणारे अग्रणी शहर म्हणून नवी मुंबईचे देशामध्ये स्थान निर्माण होणार आहे. रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतसभा, आंतरराष्ट्रीय क्रीडाविषयक कार्यक्रम, भव्य स्तरावरील सांस्कृतिक महोत्सव आणि आभासी अनुभव यांच्या आयोजनाकरिता 20 हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था आणि 25 हजार उभे प्रेक्षक इतकी क्षमता या ठिकाणी असणार आहे. यामुळे हा देशातील पहिला जागतिक दर्जाचा व भव्य क्षमता असणारा इनडोअर अरेना असणार आहे.
अटल सेतू ट्रान्स-हार्बर लिंक, हाय स्पीड
रेल्वेमार्ग आणि नवी मुंबई मेट्रो यांद्वारे अखंड आणि वेगवान कनेक्टिव्हिटी झाली आहे.
नेरूळ जेट्टीद्वारे पर्यटन, जलवाहतूक
आणि चित्रपटनिर्मितीच्या संधींमध्ये वाढ होणार आहे.
फिफा मानकांचे पालन करणाऱ्या चार खेळपट्ट्या आणि 4 हजार आसन क्षमतेचे स्टेडियम असणारे खारघर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स, 18 होल्सचे खारघर व्हॅली गोल्फ कोर्स यांनी नवी मुंबईचे क्रीडा व करमणूक क्षेत्रातील स्थान बळकट केले आहे.
आगामी मेडिसिटी, एज्युसिटी, एरोसिटी प्रकल्पांद्वारे नवी मुंबईचे एकात्मीक नगर विकास प्रारूपउठावदार होणार आहे.
नवी मुंबई हे देशाच्या नगर नियोजनाला नवीन दिशा देणारे शहर ठरले आहे. हे परिवर्तन घडवून आणण्यासह देशातील थेट करमणूक क्रांतीचा केंद्रबिंदू म्हणून नवी मुंबईला नावारूपाला आणत असल्याचा अभिमान आहे. देशातील करमणूक क्षेत्राच्या भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न आहे. हा उपक्रम अरेना विकसित करण्यापुरता मर्यादित नसून सांस्कृतिक व आर्थिक चळवळीची ही सुरुवात आहे.- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको