मुंबई : मुंबईतील हवा गुणवत्ता बिघडली असून काही ठिकाणी तर विषारी हवेने मुंबईकरांचा श्वास गुदमरला आहे. त्यात सतत वातावरणात बदल होत असल्याने मुंबईकरांचे आरोग्यही बिघडू लागले आहे. सर्दी, खोकला, ताप आणि घसा दुखणे आदी लक्षणांचे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांसह सहव्याधी असलेले रुग्ण अधिक असून पालिकेच्या रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांत ओपीडी 20 ते 30 टक्के वाढली आहे.
सकाळी थंडी, दुपारी वाढते तापमान आणि संध्याकाळी दूषीत वातावरण अशा तिहेरी कात्रीत सध्या मुंबईकर सापडले आहेत. त्यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप याबरोबरच छातीमध्ये घरघर, सुका खोकला वाढला आहे. आठवडाभरातच ही रुग्णसंख्या 30 ते 35 टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती वांद्रे येथील भाभा रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागातील सहाय्यक मानदसेवी डॉ. धीरजकुमार नेमाडे यांनी दिली. ज्येष्ठांनाही ॲलर्जीचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढले आहे. शिंका येणे, नाकातून पाणी वाहणे, नाकात खाज येणे, डोळ्यातून पाणी वाहणे आणि घशामध्ये खवखव हा त्रास अधिक असल्याचे डॉ. नेमाडे यांनी सांगितले.