jewelry Theft
सरकारी योजनेच्या नावाने महिलेचे दागिने पळविले File Photo
मुंबई

सरकारी योजनेच्या नावाने महिलेचे दागिने पळविले

पुढारी वृत्तसेवा

सरकारी योजनेतर्ंगत सात हजार रुपये मिळणार असल्याची बतावणी करुन फोटोसाठी दागिने काढण्यास प्रवृत्त करुन एका महिलेने दुसर्‍या महिलेचे दागिने घेऊन पलायन केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. याप्रकरणी पळून गेलेल्या महिलेविरुद्ध वांद्रे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तिचा शोध सुरु केला आहे.

तक्रारदार महिला ही वांद्रे येथे राहते. गेल्या आठवड्यात ती कामावरुन घरी जात होती. यावेळी तिला एका अज्ञात महिलेने थांबविले. सरकारने महिलांसाठी एक योजना सुरु असून या योजनेतर्ंगत प्रत्येक महिलेला दरमाह सात हजार रुपये मिळणार आहे. या योजनेचा अर्ज भरण्यास प्रवृत्त करुन तिने तिला फोटो काढण्यासाठी रिक्षातून अंधेरी येथे आणले. फोटो काढताना तिने तिला अंगावरील दागिने काढण्यास सांगितले. दागिने दिसल्यास तिला योजनेचा लाभ मिळणार नाही असे सांगितले. त्यामुळे तिने तिच्या अंगावरील दागिने तिला दिले होते.

बाहेर असल्याचे सांगून ती महिला तेथून पळून गेली. फोटो काढल्यानंतर तक्रारदार महिला बाहेर आली असता तिला ती महिला कुठेच दिसली नाही. जवळपास दोन तास तिची वाट पाहिल्यानंतर तिने वांद्रे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून पळून गेलेल्या महिलेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

SCROLL FOR NEXT