Women Narcotics Trafficking Pudhari
मुंबई

Women Narcotics Trafficking: ड्रग्ज तस्करीत पती-पत्नींच्या टोळ्यांचे जाळे; पुरुष आरोपींसोबत महिलांचीही सक्रिय भूमिका

पती-पत्नी आणि जवळच्या साथीदारांच्या माध्यमातून तस्करीचे जाळे; घरगुती नात्यांचा आडोसा आणि आर्थिक व्यवहारांचा वापर.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अमली पदार्थांच्या तस्करीत महिलांचा वापर केवळ वाहक म्हणून होत असल्याचे चित्र आता बदलताना दिसत आहे. काही प्रकरणांत महिला स्वतः तस्करीच्या साखळीतील महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

पती-पत्नी किंवा जवळच्या साथीदारांच्या माध्यमातून चालणाऱ्या टोळ्यांमध्ये घरगुती नात्याचा आडोसा, एकत्रित प्रवास, हॉटेलमधील मुक्काम आणि आर्थिक व्यवहारांचा वापर केला जात असल्याचे विविध कारवायांतून उघड झाले आहे.

पनवेल पोलिसांना हवा असलेला फरुख हमीद शेख ऊर्फ फरुख बटाटा याच्या शोधासाठी सहार पोलिसांनी अंधेरी पूर्वेतील विमानतळाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा टाकला. हॉटेलच्या खोली क्रमांक १०१८ मध्ये ४० लाख रुपयांची रोकड आढळली. मात्र, फरुख पोलिसांच्या हाती लागला नाही.

त्यानंतर तायबा मोहम्मद फरुख शेख आणि परवीन मोहम्मद फरुख शेख या दोन महिला अन्य व्यक्तींसह तेथे आल्या. त्यांनी आपण फरुखच्या पत्नी असल्याचे सांगितले.

१८ ऑक्टोबर रोजी वांद्रे पोलिसांनी कार्टर रोड परिसरातून निलोफर हाफिज शेख ऊर्फ निलोफर सेंडोल (५०) आणि तिचा कथित साथीदार फिरोज शेख ऊर्फ फिरोज चिकना (६१) यांना अटक केली. एप्रिल २०२६ मध्ये मिरा रोडच्या नया नगर परिसरात पोलिसांनी एका घरावर छापा टाकून फिर्दोस अर्बाज कुरेशी हिला अटक केली.

तिच्या घरातून १.३२४ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे २.६६ कोटी रुपये होती. चौकशीत या अमली पदार्थांचा संबंध पती अर्बाज वकील कुरेशी याच्याशी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली.

पुढील तपासात मुंबई, मिरा रोड आणि गुजरातमधील कथित पुरवठा साखळी उघड झाली. या कारवाईत एकूण ६.७७३ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे १३ कोटी ६१ लाख रुपये होती. अमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी महिलांचा वापर होत असल्याचे तपासात समोर आले.

महिलांच्या सहभागाची काही उदाहरणे

अंधेरी : ४० लाखांची रोकड जप्त; दोन महिला ताब्यात.

वांद्रे : कथित महिला नेटवर्क चालवणाऱ्या निलोफर शेखला अटक.

मिरा रोड : पती-पत्नींसह १३ जणांना अटक; ६.७७३ किलो मेफेड्रोन जप्त.

बोरिवली : घरात हेरॉइन तयार केल्याच्या आरोपावरून जोडप्याला अटक

वांद्रे पोलिसांनी अटक केलेल्या निलोफर हाफिज शेख आणि तिचा साथीदार फिरोज शेख यांच्या सहभागाची माहिती दुसरा आरोपी कलीम शेखच्या चौकशीतून मिळाली. निलोफर ही परिसरातील अमली पदार्थ विक्रीचे नेटवर्क चालवत असल्याचा संशय आहे. अमली पदार्थांच्या तस्करीत महिलांचा वापर केवळ संशय टाळण्यासाठी केला जात नाही, तर काही प्रकरणांत त्या स्वतः विक्रीचे नेटवर्क चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे तस्करीच्या साखळीतील प्रत्येक व्यक्तीची भूमिका, आर्थिक व्यवहार आणि परस्पर संपर्क तपासणे महत्त्वाचे ठरते.
-मोहित कुमार गर्ग, पोलीस उपायुक्त, वांद्रे विभा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT