म्हाडाचा फ्लॅट स्वस्तात देतो सांगून समाजसेविकेला गंडा pudhari photo
मुंबई

MHADA flat fraud : म्हाडाचा फ्लॅट स्वस्तात देतो सांगून समाजसेविकेला गंडा

दहा लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : लालबाग-दादर परिसरात म्हाडाचा स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून एका महिला समाजसेविकेची चारजणांच्या टोळीने सुमारे दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार परळ परिसरात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी चारही भामट्यांविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. संजय पवार, विकास भावे, जगदीश भगवान भगत आणि प्रकाश विजय मोकाशी अशी या चौघांची नावे असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.

४४ वर्षांची तक्रारदार महिला परळ येथे राहत असून ती समाजसेविका म्हणून परिचित आहे. तिचे राहते घर लहान असल्याने जानेवारी २०२२ रोजी ती दुसऱ्या फ्लॅटच्या शोधात होती. याच दरम्यान तिची संजय पवार, विकास भावे आणि जगदीश भगत यांच्याशी ओळख झाली. या ओळखीत विकास आणि जगदीशने ते दोघेही म्हाडाचे एजंट असल्याचे सांगितले होते. त्यांनी तिला म्हाडाच्या मास्टर फाईलमधील काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगून त्यातील एक फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखविले होते.

याच दरम्यान त्यांनी तिला लालबाग किंवा दादर परिसरात म्हाडाचा ४०० चौ. फुटाचा फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन तिच्याकडून टप्प्याटप्प्याने दहा लाख रुपये घेतले होते. या पेमेंटनंतर त्यांच्यात फ्लॅटबाबत करार झाला. हा फ्लॅट प्रकाश मोकाशीच्या मालकीचा असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही.

याच दरम्यान संजयने त्यांना विकासला पोलिसांनी म्हाडाच्या फ्लॅट फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केल्याचे सांगितले. तो जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांना फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र विकास जामिनावर बाहेर आल्यानंतरही त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते सर्वजण त्यांना धमकी देत होते.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तक्रारदार महिलेने घडलेला प्रकार भोईवाडा पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी संजय पवार, विकास भावे, जगदीश भगत आणि प्रकाश मोकाशी अशा चारही आरोपीविरुद्ध म्हाडा फ्लॅटसाठी घेतलेल्या दहा लाखांचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT