Chandrapur Crime : चंद्रपूरात ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; उर्जानगरातील अपार्टमेंटमध्ये चालत होता नोटा छापण्याचा कारखाना

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; मध्यप्रदेशातील एक आरोपी ताब्यात, प्रिंटरसह मोठा मुद्देमाल जप्त
Chandrapur Crime : चंद्रपूरात ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; उर्जानगरातील अपार्टमेंटमध्ये चालत होता नोटा छापण्याचा कारखाना
Published on
Updated on

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील उर्जानगर परिसरात सुरू असलेल्या बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. राजश्री अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे तब्बल ९१ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मध्यप्रदेशातील एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

चंद्रपूर शहरात बनावट नोटा छापून त्या बाजारात चलनात आणण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. माहितीनुसार, १० मार्च रोजी उर्जानगर मेजर गेट परिसरातील ‘राजश्री अपार्टमेंट’ येथे काही व्यक्ती अवैधरित्या बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०३ वर छापा टाकला.

हा फ्लॅट बंगाली कॅम्प परिसरातील सुमित पॉल यांचा असून त्यांनी एक महिन्यापूर्वी मध्यप्रदेशातील काही व्यक्तींना भाड्याने दिला होता. पोलिसांनी फ्लॅटची झडती घेतली असता आतमध्ये बनावट नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले.

या कारवाईत पोलिसांनी भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटांचे १० बॉक्स जप्त केले. तसेच नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा एप्सन कंपनीचा कलर प्रिंटर आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ९१ लाख १५ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणात पोलिसांनी मध्यप्रदेशातील शुभम दिनेश नागर (वय २६) या आरोपीला ताब्यात घेतले आहे. बनावट नोटा तयार करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या घटनेप्रकरणी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस करत असून या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा शोध घेतला जात आहे.

चंद्रपूर शहरात बनावट नोटांचा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news