मुंबई : अन्ननलिकेतील गंभीर समस्यांमुळे गेली चौदा वर्षे मुंबईतील 37 वर्षीय उज्ज्वला चव्हाण या फक्त द्रव्य पदार्थ आणि मऊ आहार प्राशन करीत होत्या. डॉक्टरांना अखेर अन्ननलिकेचा बाधित भाग काढून पोटाचा काही भाग वापरून नवीन पचनमार्ग तयार करण्यात यश आले असून आता त्या भाजी चपाती असा नॉर्मल आहार करू शकणार आहेत.
उज्ज्वला यांना लग्नानंतर काही महिन्यातच घशाचा त्रास सुरू झाला. तपासणीत अन्ननलिकेचा एकत्र असलेला भाग अरुंद होत असल्याची गंभीर बाब समोर आली. त्यावर वारंवार शस्त्रक्रिया करून अन्न सेवनासाठी जागा करून त्यांना किमान द्रव पदार्थ सेवन करता येतील अशी व्यवस्था करण्यात येत होती. मात्र दरम्यानच्या काळात अन्ननलिकेच्या खालच्या भागात कॅन्सर असल्याचे निदान झाल्याने त्यांची परिस्थिती अधिक गंभीर झाली होती.
तातडीने उपचार सुरू करत एका खासगी रुग्णालयात रोबोटिक इसोफॅजेक्टॉमी अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेत अन्ननलिकेचा बाधित भाग काढून पोटाचा काही भाग वापरून नवीन पचनमार्ग तयार करण्यात आला आहे. यशस्वी उपचारानंतर उज्ज्वल यांनी 14 वर्षांनंतर प्रथमच सॉलिड फूड सेवन केल आहे.
या समस्येमुळे उज्ज्वला यांना चपाती, भाजी यासारखे पदार्थ गिळता येत नव्हते. त्याच्यावर वारंवार वेदनादायी डिलेटेशन शस्त्रक्रिया करून फूड पॅसेज वाढवावा लागत होता. पण आता कायमस्वरूपी उपाय करण्यात आला आहे.
काय आहे इसोफॅजेक्टॉमी?
अन्ननलिकेचा काही भाग किंवा संपूर्ण अन्ननलिका काढून टाकणारी शस्त्रक्रिया.
त्यानंतर पचनमार्गाची पुनर्रचना करून पोटाचा भाग अन्ननलिकेऐवजी जोडला जातो.
कॅन्सर किंवा गंभीर स्ट्रिक्चरमध्येही पद्धत प्रभावी ठरते.