

मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील शक्ती वाघाचा 17 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. मात्र उद्यान प्रशासनाने हे लपवून ठेवले होते. मृत्यूनंतर 9 दिवसानंतर प्रशासनाने न्यूमोनियाची बाधा झाल्यानंतर श्वसनप्रणाली बंद झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे प्राणीमित्रांकडून संताप व्यक्त होत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयातून 12 फेब्रुवारी 2020 रोजी राणीच्या बागेत शक्ती (नर) करिश्मा (मादी) ही रॉयल बंगाल वाघाची जोडी देवाण-घेवाण तत्त्वावर आणली होती. तेव्हापासून ही जोडी या प्राणिसंग्रहालयाचे मुख्य आकर्षण ठरली होती. उद्यानात येणारे पर्यटक शक्ती व करिश्माला पाहण्यासाठी मोठी गर्दी करीत असत.
दरम्यान शक्ती वाघाचा 17 नोव्हेंबर मृत्य झाला. मात्र उद्यान प्रशासनाने हे गुपीत ठेवले. सर्वत्र बोंबाबोंब झाल्यानंतर त्यांना जाग आली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शक्तीच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी दुपारी अडीच वाजेपासून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय (परळ) येथील पशुवैद्यकीय पॅथेलॉजी विभागातील प्रोफेसर आणि त्यांच्या चमूने त्याचे शवविच्छेदन केले.
शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार शक्तीचा मृत्यू हा न्यूमोनिया बाधा होवून श्वसन प्रणाली बंद झाल्याने (ग्रॅन्युलोमॅटस न्यूमोनिया ज्यामुळे श्वसनक्रिया बंद पडते) ओढवला. यापूर्वी शक्तीला कुठल्याही प्रकारच्या आजारपणाचे लक्षण नव्हते, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या कारणाचा अहवाल सादर केला जाणार आहे.
15 नोव्हेंबर- शक्तीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्याला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. पाण्यातून औषधही देण्यात आले.
16 नोव्हेंबर- शक्तीने कोंबडीचे थोडे मांस खाल्ले व पाणी प्यायले. त्यानंतर त्याला उलटीचा उमाळा आला.
17 नोव्हेंबर-आरोग्य तपासणी करण्यासाठी पिंजऱ्यात घेत असताना त्याला अचानक अपस्माराचे झटके आले आणि दुपारी सव्वा बारा वाजता त्याचा मृत्यू झाला.
शक्ती वाघाच्या अवयवांचे नमुने नागपूर येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (गोरेवाडा) येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. मात्र मृत्यूची सविस्तर माहिती नियमानुसार केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांना दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी इ-मेलद्वारे कळविण्यात आली आहे. प्राणिसंग्रहालयातील शिष्टाचारानुसार शक्ती वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
संजय त्रिपाठी, अधिकारी, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील