पत्नीचे उत्पन्न पोटगीच्या हक्काच्या आड येऊ शकत नाही pudhari photo
मुंबई

Marital dispute alimony case : पत्नीचे उत्पन्न पोटगीच्या हक्काच्या आड येऊ शकत नाही

केस, रंगावरुन टोमणे मारणाऱ्या पतीला न्यायालयाची चपराक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पत्नीला तिचा रंग, केस आणि ड्रेसच्या आवडीनिवडीवरून टोमणे मारणाऱ्या पतीला गिरगावच्या दंडाधिकारी न्यायालयाने चांगलाच झटका दिला. पत्नीचे उत्पन्न पोटगीच्या हक्काच्या आड येऊ शकत नाही, पोटगी हा स्वतंत्र हक्क आहे. त्याचा वैवाहिक आरोपांपासून अलिप्तपणे विचार केलाच पाहिजे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत दंडाधिकारी न्यायालयाने अर्जदार महिलेला पतीकडून दरमहा 25 हजार रुपयांची पोटगी मंजूर केली.

पतीसह सासरच्या इतर मंडळींवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करीत महिलेने पोटगीसाठी दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती. पतीकडून दरमहा 60 हजार रुपयांच्या पोटगीची मागणी तिने केली होती. तिच्या अर्जावर गिरगाव येथील न्यायदंडाधिकारी एस. आर. निमसे यांनी निर्णय देताना पोटगीची विनंती अंशतः मान्य केली. पतीने अर्जदार महिलेला दरमहा 25 हजार रुपयांची पोटगी द्यावी, असे निर्देश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले.

या प्रकरणात अर्जदार महिलेचा कौटुंबिक छळ होत असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे, असे न्यायालयाने नमूद केले. दाम्पत्याचे लग्न 4 डिसेंबर 2016 मध्ये झाले होते. मात्र सासरच्यांकडून वारंवार त्रास दिला गेल्यानंतर महिला 20 ऑगस्ट 2022 रोजी पतीपासून अलिप्त झाली होती. महिलेला हुंड्यासाठी छळण्याबरोबर वारंवार रंग, केस आणि तिच्या ड्रेसच्या निवडीवरुन टोमणे मारले जात होते.

हा कौटुंबिक छळ असल्याचा दावा महिलेने केला आणि पोटगीसाठी न्यायालयाचे दार ठोठावले होते. मात्र पतीने तो आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे म्हणणे मांडत पोटगीची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यावर पतीला जबाबदारीची जाणीव करुन देत न्यायालयाने पोटगीचा आदेश दिला. पत्नी कितीही पैसे कमावत असली तरी पतीला तिचा सांभाळ करण्याप्रतीचे कर्तव्य झटकता येणार नाही. पती केवळ नोकरीचा राजीनामा दिला असल्याचे सांगून पत्नीला सांभाळण्याच्या कर्तव्यातून पळ काढू शकत नाही, असे निरीक्षण न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT