Mumbai railway 
मुंबई

Mumbai Western Railway |परेचा वक्तशीरपणा घसरला

वेळ पाळण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.२७ टक्क्यांची घट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : उपनगरी लोकल रेल्वे गाड्यांमध्ये निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे मुंबईकरांचे कामावर जायचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वारंवार होणाऱ्या या बिघाडांमागे अनेक कारणे समोर आली आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वेळ पालनाची सरासरी टक्केवारी घसरली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.२७ टक्क्यांची घट यंदा झाली आहे. एसी लोकलमधील स्वयंचलित दरवाजांमधील दोष, लेव्हल क्रॉसिंग गेटचे संचालन, रेल्वे अपघातात मनुष्यहानी, पावसामुळे गाड्यांवर होणारा परिणाम अशा अनेक कारणांमुळे उपनगरी सेवेचे वेळापत्रक घसरले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पश्चिम रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात घसरण सुरू आहे. एसी लोकलमुळे दररोज १५ ते २० उपनगरी फेऱ्यांना विलंब होत आहे.

अनेक वेळा भरगर्दीत एसी लोकलचे स्वयंचलित दरवाजे वेळेत उघडत किंवा बंद होत नाहीत. त्यामुळे प्रमुख स्थानकांवर सुरक्षा कर्मचाऱ्यांना मध्यस्थी करत प्रवाशांना डब्यात सोडण्याचे किंवा उतरण्याचे काम करणे भाग पडत आहे. त्यामुळे रेल्वेची निर्धारित वेळ चुकून लोकलला उशीर होत आहे. अशात जानेवारी ते जून २०२६ दरम्यान पश्चिम रेल्वेची वेळपालनाची सरासरी ९५.०७ टक्के नोंदवली गेली आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत ती ९५.३४ टक्के होती. म्हणजेच वेळपालनात ०.२७ टक्क्यांची घट झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अर्धवट उघडलेल्या दरवाज्यांमुळे चढ-उतार करताना अपघाताचा धोका अधिक वाढला आहे-दरवाजे बंद होण्यापूर्वीच डब्यात शिरण्यासाठी धावपळीत एखाद्या प्रवाशांचा मोठा अपघात होऊ शकतो. शिवाय लोकलच्या काही मिनिटांचा विलंब प्रवाशांच्या ऑफिसच्या वेळेवर मोठा परिणाम करत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

हल्ली काही एसी लोकलचे दरवाजे पूर्णपणे उघडणे किंवा अर्धवट उघडण्याच्या घटना घडत आहेत. तसेच तांत्रिक बिघाडामुळे लोकल रद्द होणे किंवा बराच वेळ थांबविली जाते. अशात तांत्रिक तपासणी आणि प्रवाशांना चढ-उतार करण्यासाठी वेळ लागत असल्याने त्याचा परिणाम उपनगरीय लोकल सेवेवर होत असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT