‘परे‌’वर होणार मेगाहाल pudhari photo
मुंबई

Railway block‌ : ‘परे‌’वर होणार मेगाहाल

तीन दिवस 639 लोकल रद्द , एक्स्प्रेसलाही फटका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवलीतील नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक संपतो ना संपतो तोच कांदिवली-बोरिवलीदरम्यान सहाव्या रेल्वेमार्गासाठी सुरू असलेल्या कामासाठी उद्या शनिवार 27 डिसेंबर ते सोमवार 29 डिसेंबरदरम्यान 629 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार-रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबर रोजी 158 अप आणि 138 डाऊन अशा 296 लोकल फेऱ्या, 28 डिसेंबर रोजी 120 अप आणि 115 डाऊन अशा 235 लोकल फेऱ्या आणि 29 डिसेंबर रोजी 49 अप आणि डाऊन 49 अशा 98 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. या सर्व लोकल सेवांमध्ये जलद, धीम्या लोकलचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे. नववर्षानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या आणि मुंबईत फिरायला येणाऱ्या पर्यटकांना या ब्लॉकचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस -बोरिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. कांदिवली - बोरिवलीदरम्यान पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. यासाठी 20 डिसेंबरपासून पुढील 30 दिवसांसाठी वाहतूक ब्लॉक घेण्यात येत आहेत. 18 जानेवारी 2026 पर्यंत हा ब्लॉक सुरू राहणार आहेत.

27 डिसेंबर रोजी रात्री 1 ते सकाळी 7 दरम्यान बोरीवली येथील उप आणि डाऊन मार्गावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग पॅनेल कार्यान्वित करण्यासाठी एक मोठा नॉन-इंटर लॉकिंग ब्लॉक घेतल्यानंतर आता रविवारीही रेल्वे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

या ब्लॉकदरम्यान काही अप मेल / एक्स्प्रेस बोरिवली स्थानकावर थांबणार नाहीत. तसेच ब्लॉकनंतर बोरिवली स्थानकाचे फलाट क्रमांक 8 आणि 9 हे 29 डिसेंबरपर्यंत बंद राहतील. या ब्लॉकमुळे पाचवा मार्ग आणि बोरिवली फलाट क्रमांक 8 व 9 बंद असल्यामुळे काही लोकलफेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. बोरिवली / अंधेरीच्या काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत धावतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

रविवारी माटुंगा-मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक

  • मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी माटुंगा - मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर 11.05 ते 15.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 10.36 ते 15.10 वाजेदरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानक येथून डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाणे येथून 11.03 ते 15.38 वाजेदरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानक येथून अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावरही पाच तासांचा मेगाब्लॉक

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / बांद्रा दरम्यान डाउन हार्बर मार्गावर 11.40 ते 16.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/बांद्रा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप हार्बर मार्गावर 11.10 ते 16.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 11.16 ते 16.47 वाजेदरम्यान वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या तसेच 10.48 ते 16.43 वाजेदरम्यान बांद्रा/गोरेगावकडे जाणाऱ्या सेवा रद्द राहतील.

  • पनवेल/बेलापूर/वाशी स्थानक येथून 9.53 ते 15.20 वाजेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या तसेच गोरेगाव/बांद्रा स्थानक येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 17.13 वाजेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

विशेष सेवा 20 मिनिटांच्या अंतराने

ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा 20 मिनिटांच्या अंतराने चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना 10.00 ते 18.00 वाजेपर्यंत मुख्य मार्ग व पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT