Politial News pudhari
मुंबई

Politial News: हा भारताला वाचविणारा विजय: फडणवीस

पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी येथील विजयानंतर मुंबईत भाजपचा जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पश्चिम बंगालमधील विजय हा काही केवळ एका राज्याचा विजय नाही. तो भारतात होणारी घुसखोरी, दहशतवादी कारवाया यापासून भारताला वाचविणारा हा विजय आहे. ममतादीदींचे सरकार बांग्लादेशातून घुसखोर आणायचे. तिथून कागदपत्रे मिळवून ते देशभर जाऊन आमचा रोजगार तर खात होतेच पण आमच्या देशाच्या एकसंधतेला धोका निर्माण करत होते. आज हा विजय भारतातील प्रत्येक राष्ट्रवादी शक्तीचा विजय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यात पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीत भाजपने यश मिळविले आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र भाजपच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार चित्रा वाघ आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आधी 30 वर्षे काँग्रेस, 36 वर्षे कम्युनिस्ट आणि त्यापेक्षाही खतरनाक ममतादिदींचे 15 वर्षांचे शासन बंगालमध्ये होते. कधी काळी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या बंगालची दुरवस्था झाली.

मात्र, पंतप्रधान मोदींनी बंगालसाठी व्हिजन मांडले. लोकांच्या मनात आशेचा किरण जागृत केला. एका बाजूला दिदीचे कुशासन दुसऱ्या बाजूला मोदींच्या माध्यमातून हजारो कोटीची कामे सुरू होती. त्यामुळे बंगालमध्ये मोदीच घडवू शकतात हा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. तो त्यांनी मतपेटीतून व्यक्त केला आहे.

आपले मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आणि आधुनिक राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जाणारे गृहमंत्री अमित शहा यांनी चोख योजना तयार केली. या विजयासाठी अमित शहा, पक्षाध्यक्ष नितीन नबीन तसेच बंगालच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये जनतेने 92 टक्के मतदान करून लोकशाहीचा विजय झाल्याचे दाखवून दिले आहे. आता उद्या सकाळी 9 वाजता कोणी हा लोकशाहीचा पराभव झाला वगैरे बडबड केली तर अशा लोकांचा गांजा कुठे मिळतो, हे कळवा. ताबडतोब कारवाई करू, असा टोलाही फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT