मुंबई : वडाळा येथील गृहनिर्माण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून गुरुवारी सभागृहात मंजुरीसाठी सादर करण्यात आला. मात्र सभागृहात तीन चतुर्थांश बहुमत सत्ताधाऱ्यांना सिद्ध करता आले नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना- भाजपा महायुती हरली तर विरोधक जिंकले. त्यामुळे हा प्रस्ताव राखून ठेवण्याची नामुष्की महापौरांवर ओढवली.
वडाळा येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला सुधार समितीमध्ये अलीकडेच भाजपा -शिवसेना महायुतीने बहुमताच्या जोरावर मंजुरी दिली होती. वडाळा रफी अहमद किडवाई मार्ग येथील दादर नायगाव येथील आझाद नगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेच्या मालमत्तेचा विकास तसेच लगतच्या कमला नगर म्हणून महापालिकेच्या मालकीच्या झोपडपट्टी व्याप्त भूखंडाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
हा प्रस्ताव गुरुवारी तातडीचे कामकाज म्हणून अग्रक्रम देण्याची मागणी सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी केल्यानंतर विरोधकांनी यावर पोलची मागणी केली. यावर महापौरांनी मतदानासाठी हा प्रस्ताव पटलावर ठेवला होता. मात्र दोन तृतीयांश मतदान न झाल्याने महापौरांना हा प्रस्ताव राखून ठेवावा लागला.
मुख्यमंत्र्यांनी विचारला जाब
मुंबई महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असताना प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी योग्य नियोजन न करणे व नगरसेवकांना उपस्थित राहण्याची सक्ती न करणे, यामुळे महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर करणे शक्य झाले नाही. भाजपाच्या या नामुष्कीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून पालिकेतील नेत्यांना जाब विचारल्याचे बोलले जात आहे. हा प्रस्ताव रात्री अर्थसंकल्पाचे कामकाज संपल्यानंतर घेणे योग्य ठरले, पण समन्वयाचा अभाव असल्यामुळे हा घोळ झाल्याचे बोलले जात आहे.
या प्रस्तावावर भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांनी अनुकूलच्या बाजूने हात उंचावत मतदान केले. तर शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, मनसे, एमआयएमच्या नगरसेवकांनी प्रतिकूलच्या बाजूने हात उंचावत मतदान केले. यामध्ये अनुकूलच्या बाजूने 61 नगरसेवकांनी मतदान केले तर प्रतिकूलच्या बाजूने 58 नगरसेवकांनी मतदान केले. त्यामुळे पोलमध्ये दोन तृतीयांश मतदान न झाल्याने महापौर रितू तावडे यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला. त्यामुळे प्राधान्याने या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न फसला. परिणामी महापालिकेतील सत्ताधारी पक्षावर मोठी नामुष्की ओढावली.