

ठाणे : ठाणे महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही अद्याप स्थायी समिती, विषय समित्या तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. यामागे नक्की गौडबंगाल काय आहे अशी शंका भाजपचे आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केली असून त्यांनी सत्ताधारी शिवसेनेवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. दुसरीकडे स्वतः ठाणे महापालिकेच्या सभागृहात उपस्थित राहून अर्थसंकल्पावरील नगरसेवकांची अर्थसंकल्पावरील मते त्यांनी ऐकून घेतली. स्वतः आमदार सभागृहात येणार आहेत याची कल्पना भाजपच्या नगरसेवकांना देखील देण्यात आली नव्हती, त्यामुळे केळकर यांच्या अचानक येण्याने भाजपच्या नगरसेवकांना आश्चर्याचा धक्का बसला. ठाणे महापालिकेत शिंदे सेना 75, भाजप 28, राष्ट्रवादी (शरद पवार) 12, राष्ट्रवादी (अजित पवार) 9, एमआयएम 5, उध्दव सेना 1 आणि अपक्ष 1 असे 131 नगरसेवकांचे समीकरण आहे.
त्यातही शिंदे सेनेने पुन्हा एकहाती सत्ता प्रस्थापित केली असल्याने स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन, विषय समित्यांमध्ये शिंदे सेनेला मोठा वाटा मिळणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यातही स्थायी समितीमध्ये कोण कोण जाणार याबाबत सर्वांमध्येच उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र अद्याप कोणत्याच महत्वाच्या समित्या तसेच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नसल्याने याबाबत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मात्र शंका उपस्थित केली आहे.
ठाणे महापालिकेत स्पष्ट बहुमत असताना अद्याप या सर्व समित्या गठीत का केल्या जात नाही. शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि महत्वाचे निर्णय घेण्याबरोबरच महापालिकेच्या कामकाजामध्ये या सर्व समित्या महत्वाच्या आहेत. त्यामुळे या समित्या गठीत न होण्यामागे नेमके गौडबंगाल काय आहे अशी शंका आमदार केळकर यांच्याकडून उपस्थित करण्यात आली आहे.
सोमवारी त्यांनी अचानक ठाणे महापालिकेत हजेरी लावली. सुरुवातीला ते उपमहापौर कार्यालयात बसले. मात्र अचानक भाजपच्या नगरसेवकांना देखील कोणत्याही प्रकारची कल्पना न देता ते थेट सभागृहातील अतिमहत्त्वाचे व्यक्ती ज्या गॅलरीमध्ये बसतात त्या गॅलरीमध्ये दाखल झाले. त्यामुळे सर्वच भाजपच्या नगरसेवकांना यावेळी आश्चर्याचा धक्का बसला.