वाडा : वाडा तालुक्यातील गावागावात सध्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांचा समावेश सर्वाधिक आहे. ग्रामीण भागाला मुख्य रस्त्यांशी जोडण्याच्या हा प्रयत्न आशादायी असला तरी या रस्त्यांच्या पोटात विविध यंत्रणांच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या रस्त्यांचा निधी गडप झाला आहे. प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा असणारा अभाव यातून स्पष्ट होत असून सरकारी निधीचा होणारा अपव्यय बघायला मिळत आहे.
वाडा तालुक्यातील वरसाळे ते नवापाडा रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हाती घेण्यात आले असून जवळपास 3 किमी मार्गाचे डांबरीकरण यात होणार आहे. मागील वर्षी याच मार्गावर काटीचापाडा गावाजवळ 3045 - 2722 या राज्यस्तर योजना रस्ते व पूल परीक्षण कार्यक्रम अंतर्गत 200 मीटर अंतराच्या रस्त्याचे काम जवळ्पास 10 लाख रुपयांना निधी खर्च करण्यात आला होता.
वरसाळे गावाच्या पुढे अशाच पद्धतीने पंचायत समिती बांधकाम विभागामार्फत रस्ता बनविण्यात आला होता. रस्ता बनविल्यानंतर किमान पाच वर्षे रस्ता लोकांसाठी कामात यावा अशी अपेक्षा असते.
नवापाडा रस्त्याची अवस्था दयनीय असून जागोजागी बांधकाम विभागामार्फत केवळ निकृष्ट कामे केली जातात. लोकांच्या सोईसाठी तातडीने पूर्ण रस्त्याचे काम हाती घ्यावे अशी दैनिक पुढारीने वृत्त प्रसिद्ध करून अनेकदा मागणी केली होती. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम हाती घेतल्याने लोकांनीही समाधान व्यक्त केले आहे.