Vinayak Raut police protection : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांच्यावर सून गिरीजा राऊत यांनी मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले असतानाच आता राज्य शासनाच्या संरक्षण शाखा-१ कडून त्यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण काढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण शाखा-१ कडून विनायक राऊत यांना पत्राद्वारे त्यांचे पोलीस संरक्षण मागे घेण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे. यापूर्वी ३० मे रोजीच त्यांचे संरक्षण काढण्याबाबतचे अधिकृत पत्र पाठवण्यात आले होते. यानंतर आपले पोलीस संरक्षण कायम ठेवावे, अशी विनंती करणारे पत्र विनायक राऊत यांनी प्रशासनाला पाठवले होते. मात्र, संरक्षण शाखा-१ ने त्यांची ही मागणी अमान्य करत, त्यांना पुन्हा संरक्षण देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
पोलीस संरक्षण काढले जाण्याच्या या मोठ्या घडामोडींनंतर विनायक राऊत यांना आणखी एक धक्का बसला आहे. विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात ठाण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.
गिरिजा राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्न होऊनही मुलं होत नसल्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या सासरच्या लोकांनी अपत्यप्राप्तीसाठी अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचा आधार घेतला. या अघोरी कृत्यांमध्ये त्यांना जबरदस्तीने सामील करून घेत त्यांचा मानसिक व शारीरिक छळ f;yh. या प्रकरणात पोलिसांनी पती गीतेश राऊत, सासरे, माजी खासदार विनायक राऊत, सासू आणि भोंदू बाबा फिरोज शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
विनायक राऊत यांनी गिरीजा यांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. "माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. ती (गिरीजा) गेल्या तीन वर्षांपासून गितेशसोबत राहत नाही. तिचे आई-वडील स्वतः बाबा-बुवांकडे जात होते, मग तेव्हा त्यांनी तक्रार का केली नाही? २०२२ मधील घटनेची २०२६ मध्ये तक्रार केली जात आहे, यावरूनच यात काहीतरी काळंबेर असल्याचे स्पष्ट होते. घटस्फोटाचा खटला दाखल केला आहे. पहिल्या बैठकीत त्यांनी ५ कोटी रुपये, ३-बीएचके फ्लॅट, दरमहा २ लाख रुपये आणि गाडीची मागणी केली होती. दुसऱ्या बैठकीत ही मागणी वाढवून १० कोटी रुपये आणि दरमहा ५ लाख रुपये करण्यात आली. मानसिक त्रासापोटी २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई, अशी एकूण १२ कोटी रुपयांची मागणी करत घर आणि गाडीवरही त्यांनी हक्क सांगितला. ही अवाजवी मागणी आम्ही मान्य केली नाही, म्हणूनच हे सगळे खोटे आरोप करण्यात आले आहेत," असा दावाही राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता.