

Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut case
ठाणे: ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. विनायक राऊत, त्यांचे पुत्र आणि नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी त्यांच्या सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. गिरीजा यांनी राऊत कुटुंबावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. जादूटोणा आणि अघोरी प्रथांचा अवलंब केल्याचा ठपका त्यांनी कुटुंबावर ठेवला आहे.
माजी खासदारांच्या सून गिरीजा राऊत यांचे गंभीर आरोप
तक्रारदार गिरीजा राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत. राऊत कुटुंबाने आपल्याला बळजबरीने गोमूत्र पिण्यास भाग पाडले, तसेच डोक्यावरील केस उपटून अघोरी कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात गिरीजा राऊत यांच्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. सासरे माजी खासदार विनायक राऊत, नवरा नगरसेवक गितेश राऊत, राऊत कुटुंबातील इतर सदस्यांसह फिरोज बाबा व काजी बाबा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.