Garden  
मुंबई

Garden Department Vigilance Inquiry|उद्यान विभागाच्या कामांची दक्षता विभागामार्फत चौकशी

'सार आयटी'ला नियमबाह्य कंत्राट दिल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील संशयास्पद कारभाराची आणि वृक्षगणनेसह इतर कामांतील कंत्राट वाटपाच्या गैरव्यवहाराची पालिका दक्षता (विजिलन्स) विभागामार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी यासंदर्भात शुक्रवारी चौकशीचे थेट आदेश दिले आहेत. उद्यान विभागाची बहुतांश कामे 'सार आयटी रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड' या एकाच खासगी कंपनीला नियमबाह्यपणे वारंवार दिली जात असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली होती. २०१४ पासून आतापर्यंत या एकाच कंपनीला विविध कंत्राटांच्या माध्यमातून सुमारे ८ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. यामध्ये झाडांची गणना करणे (ट्री सेन्सस), ग्रीन कव्हर मॅपिंग आणि मॉनिटरिंग, मियावाकी झाडांचे मॅपिंग वारसा वृक्षांचे (हेरिटेज ट्री) क्यूआर कोडिंग यांसारख्या सर्व महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, महापालिकेच्या उद्यान उपआयुक्तांसाठी स्वतंत्र कॉल सेंटर चालवण्याचे कंत्राटही याच कंपनीला बहाल करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात हे कॉल सेंटर आणि त्याचा दिलेला दूरध्वनी क्रमांक पूर्णपणे बंद आणि अकार्यक्षम असल्याचे तक्रारीत उघड झाले आहे.

मुंबईतील धोकादायक झाडांसंदर्भात एक निश्चित धोरण आखण्यासाठी सर्व वॉर्ड कार्यालयांनी उद्यान अधीक्षकांच्या कार्यालयाकडे अनेक प्रस्ताव पाठवले होते. मात्र, हे अत्यंत महत्त्वाचे प्रस्ताव तत्कालीन महापालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी कधी सादरच केले गेले नाहीत.

उद्यान विभागातील वृक्षगणना आणि अकार्यक्षम कॉल सेंटरबाबत गंभीर तक्रार प्राप्त झाल्याने महापालिकेच्या दक्षता विभागाला चौकशीचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT