Mahayuti Meeting Pudhari
मुंबई

Maharashtra Politics: शिवसेनेच्या बंडखोरीचे भाजपसमोर आव्हान!

भारतीय जनता पक्षाकडे संपूर्ण बहुमत नसलेल्या किमान चार ठिकाणी शिंदे यांच्या पक्षातर्फे बंडाचे झेंडे उभारण्यात आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे नाराज असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीतही विशेष महत्त्व दिले न गेल्यामुळे विधानपरिषदेच्या चार मतदारसंघांमध्ये त्यांनी बंडखोरीला आशीर्वाद दिला का, असा प्रश्न आता समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाकडे संपूर्ण बहुमत नसलेल्या किमान चार ठिकाणी शिंदे यांच्या पक्षातर्फे बंडाचे झेंडे उभारण्यात आले आहेत.

सोलापूर येथे रमेश बारस्कर, अमरावती येथे विप्लव बजोरिया, संभाजीनगर येथे अब्दुल सत्तार हे मोठे बंडखोर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस लढत असलेल्या रायगड येथे महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली, जळगाव येथे गुलाबराव पाटील यांचा मुलगा असे बंडखोर हे स्वतःहून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेणार होते काय, असा प्रश्न आहे.

बंडखोरांचा भाजपला त्रास

काही मतदारसंघांत शिवसेनेचे बंडखोर त्रास देऊ शकण्याच्या परिस्थितीत आहेत. भारतीय जनता पक्षाला जेरीला आणण्याचे हे धोरण शिंदे यांच्या आशीर्वादाने स्वीकारले गेले आहे की, ते येत्या दोन दिवसांत बंडोबांना शांत करणार आहेत, यावर राजकीय वर्तुळात अंदाज बांधणे सुरू आहे.

गेले काही दिवस शिंदे नाराज

गेल्या काही दिवसांपासून शिंदे बदली-बढती तसेच खात्याला मिळालेले अधिकार, याबाबत कमालीचे नाराज होते. त्यातच त्यांनी परिषदेत पाच मतदारसंघांत लढण्याची मागणी पुढे केली होती. प्रत्यक्षात केवळ तीन मतदारसंघांत शिंदे यांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता असताना त्यांना चौथा नाशिकचा मतदारसंघ दिला, तेथे आमचे संख्याबळ जास्त आहे, तरीही हट्ट पुरवला, असे भारतीय जनता पक्षाचे नेते खासगीत सांगत आहेत.

समजावणीच्या सुराला शिवसेनेचा विरोध

मात्र, या समजावणीच्या सुराला शिवसेना शिंदे गटाचा विरोध असल्याचे स्पष्ट दिसते आहे. भाजपने नाशिकला गीते यांच्या रूपाने बंडखोर दिला आहे. रायगडसारखी जागा आमच्याकडे बहुमत असतानाही आम्हाला मिळाली नाही. ती जागा केवळ भारतीय जनता पक्षाचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसला खूश ठेवायचे असल्याने याकडेही लक्ष वेधले जाते आहे. पुणे येथे राष्ट्रवादीला झुकते माप दिले. त्यांना दोन जागा का दिल्या, असा प्रश्नही पुढे केला जातो आहे.

विप्लव बजोरिया यांनी अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे यांच्याविरोधात केलेली बंडखोरी ही नुकतेच शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केलेल्या बच्चू कडू यांच्या आशीर्वादाने असल्याचा भारतीय जनता पक्षाचा दावा आहे.

सोलापुरात प्रशांत परिचारक दूर

सोलापूर मतदारसंघात प्रशांत परिचारक यांना दूर ठेवत देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू सहकारी असलेल्या राजा राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी हा निर्णय घेतला गेला.

मात्र, तेथे सेनेचे रमेश बारस्कर हे रिंगणात उतरले आहेत. लातूर मतदारसंघामध्ये लिंगायत मते मिळावी त्यासाठी बसवराज पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली. तेथेही शिंदे यांचे धोरण मदत करण्याचे आहे का, याबद्दल सध्या शंका व्यक्त केली जाते आहे.

आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना ताकद

त्यातच शिंदे यांनी ठाण्याच्या निवासस्थानी बसून प्रत्येक बंडखोराला तुझी ताकद काय, तू खरेच आव्हान देऊ शकतोस काय, अशी दूरध्वनीवरून विचारणा केल्याची चर्चा सुरू झाली होती. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर पुढे जायचे ठरवले, तर आपले कार्यकर्ते सज्ज असावेत आणि त्यांना आतापासूनच ताकद दिली जावी, या हेतूने शिंदे यांनी ही व्यूहरचना केली असल्याचे मानले जाते.

शिवसेनेतही नाराजी

रायगडसारखा आमची ताकद असलेला मतदारसंघ आम्हाला द्यायचा नाही हा कुठला प्रकार, असा प्रश्न शिंदे यांचे निकटवर्तीय करत आहेत. ठाणे येथे बहुजन विकास आघाडीला शिंदे बरोबर घेणार, असा संशय येताच भारतीय जनता पक्षाने विरोधात आघाडी उभारल्याचाही या पक्षाला राग आलेला आहे. आमचे निर्णय आम्ही का घेऊ नयेत, असा प्रश्नही यासंदर्भात विचारला जातो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT