Versova - Andheri Metro Train Pudhari News Network
मुंबई

Versova - Andheri Metro Train : वर्सोवा-अंधेरी सहा डब्यांची मेट्रो धावणार!

अतिरिक्त डबे खरेदी करण्यासाठी एनएआरसीएलकडे प्रस्ताव सादर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विवेक कांबळे

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो 1 मार्गिकेवर लवकरच सहा डब्यांची मेट्रो धावण्याची शक्यता आहे. या मार्गिकेवर सध्या 4 डब्यांची मेट्रो चालवली जात असून प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र लवकरच डब्यांची संख्या वाढणार असल्याची चिन्हे असून या निर्णयाने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मेट्रो 1 मार्गिकेचे संचलन करणार्‍या मुंबई मेट्रो वन प्रा. लि. या कंपनीने मेट्रो गाडीकरिता अतिरिक्त डबे खरेदी करण्यासाठी इंडिया डेब्ट रिझोल्यूशन कंपनीमार्फत नॅशनल अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे (एनएआरसीएल) प्रस्ताव सादर केला आहे. मागील महिनाभरापासून याबाबत चर्चा सुरू होती, अशी माहिती एमएमओपीएलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

मेट्रो 1 मार्गिकेवर सध्या 5 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळी या मार्गिकेवरील स्थानकांवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागतात. परिणामी, अधिक प्रवाशांची वाहतूक करता यावी, यासाठी या मार्गिकेवर सहा डब्यांची मेट्रो चालविण्याची मागणी केली जात होती. अखेर एमएमओपीएलने आता एनएआरसीएलकडे प्रस्ताव सादर करून या मेट्रो मार्गिकेवर सहा डब्यांची गाडी सुरू करण्यासाठी अतिरिक्त कोच खरेदीची परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळाल्यास या मेट्रो मार्गिकेसाठी अतिरिक्त डबे खरेदीचा मार्ग मोकळा होणार आहे.

मेट्रो 1 मार्गिकेवर चार डब्यांच्या गाडीतून साधारणपणे एकावेळी 1750 प्रवाशांची वाहतूक होते. या मार्गिकेवर सहा डब्यांची गाडी धावू लागल्यास प्रवासी वाहून नेण्याची क्षमता 2250 पर्यंत वाढू शकेल. तर प्रत्येक फेरीला 2700 प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होईल. त्यातून कार्यालयीन वेळेत अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता निर्माण झाल्याने मेट्रो 1 मार्गिकेच्या स्थानकांवरील गर्दी टळेल. तसेच प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल. मेट्रो 1 मार्गिकेची लांबी 11.4 कि.मी. असून या मार्गावर 12 स्थानके आहेत.

प्रवासी क्षमता 900 ने वाढणार

मेट्रोच्या प्रत्येक गाडीतून जवळपास 1 हजार 800 प्रवासी प्रवास करतात. आणखी दोन डबे जोडल्यास मेट्रोची क्षमता साधारण 900 ने वाढेल. सहा डब्यांची मेट्रो चालवण्याच्या दृष्टीनेच प्लॅटफॉर्मची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या बांधकामाची गरज भासणार नाही.

मेट्रो 1 वर 1,711 कोटींचे कर्ज

मेट्रो 1 मार्गिकेची खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर उभारणी करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी 2 हजार 356 कोटी रुपयांचा खर्च आला होता. त्यात रिलायन्स इन्फ्राची 74 टक्के, तर एमएमआरडीएची 26 टक्के भागीदारी आहे. मेट्रो 1 मार्गिकेवर सहा बँकांचे सुमारे 1,711 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

बँक परवानगीशिवाय कोचखरेदी अशक्य

या मेट्रोचे संचलन करणार्‍या एमएमओपीएल कंपनीने हे कर्ज फेडण्यास असमर्थता दर्शविल्याने बँकांनी दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी एनसीएलटीमध्ये धाव घेतली होती. तसेच यावर्षी या बँकांनी हे कर्ज एनएआरसीएल या सरकारी कंपनीला विकले होते. त्यामुळे आता एनएआरसीएलकडून या कर्जाची वसुली केली जाणार आहे. त्यामुळे बँकेच्या परवानगीशिवाय अतिरिक्त कोच खरेदी करणे एमएमओपीएलला शक्य नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT