

पुणे : बहुप्रतीक्षित स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला येत्या तीन महिन्यांनी सुरुवात होणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू असून, आगामी दोन महिन्यांमध्ये ठेकेदाराची नेमणूक केली जाणार आहे. त्यानंतर लगेच पुढील महिन्यात म्हणजेच आजपासून तीन महिन्यांनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील काही महिन्यांपूर्वी स्वारगेट-सिव्हील कोर्ट भूमिगत मार्गाचे उद्घाटन आणि त्याचवेळी स्वारगेट-कात्रज भूमिगत मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. या स्वारगेट-कात्रज भूमिगत मार्गामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमानंतर या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी मेट्रोकडून युध्दपातळीवर तयारी केली जात आहे.
स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रो मार्गासाठी 100 मीटरपेक्षा अधिक जमिनीखालून खोदकाम करावे लागणार आहे. त्याकरिता आवश्यक असलेला जिऑलॉजिकल सर्व्हे मेट्रोकडून करण्यात आला आहे. आता निविदा प्रक्रिया कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, ती पूर्ण झाल्यावर अवघ्या तीन महिन्यानंतर म्हणजेच सप्टेंबर 2025 पासून या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. अत्याधुनिक टीबीएम मशिनद्वारे हा भुयारी मार्ग तयार होणार आहे, अशी माहिती मेट्रो अधिकार्यांनी दै.’पुढारी’च्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आगामी तीन महिन्यांत सुरुवात होणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू असून, तिचे काम पूर्ण झाल्यावर दोन महिन्यांत ठेकेदाराची नियुक्ती केली जाईल, त्यानंतर लगेचच महिनाभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, महामेट्रो
स्वारगेट-कात्रज हा मेट्रो मार्ग पूर्णत: भूमिगत असणार आहे.
पर्पल मार्गिकेतील 5.46 किमीची ही विस्तारित मार्गिका आहे.
तीन भूमिगत स्थानकांचा समावेश असणार
स्थानके मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजीनगर आणि कात्रज उपनगर यांसारख्या प्रमुख क्षेत्रांना जोडतील
2954.53 कोटीपर्यंत खर्च येणार
फेब—ुवारी 2029 पर्यंत कामे पूर्ण करण्याचे ध्येय
आगामी काळात मेट्रोने थेट कात्रज ते निगडीपर्यंत प्रवास शक्य
टीबीएम मशीनद्वारे
भुयारी मार्ग तयार होणार