नवी मुंबई : राजेंद्र पाटील
परतीचा पाऊस आणि बदलत्या हवामानाचा फटका राज्यातील शेतमालाला बसला असून परिणामी गेल्या आठवड्यापासून शेतमालाची आवक 30 ते 40 टक्क्यांनी घटली. यातून किरकोळ बाजारात भाजीपाला सरासरी 60 ते 100 रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. कोथिंबीर जुडी 20 रुपयांवरून 50 रुपयांवर गेली आहे.15 डिसेंबरपर्यंत म्हणजेच महिनाभर भाजी बाजारात हीच स्थिती राहील, अशी माहिती घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बडदे यांनी पुढारीशी बोलताना दिली.
परतीच्या पावसाने, लागवड केलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान केले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. तोडणीसाठी आलेला भाजीपाला शेतातच सडला. पालेभाज्यांसह गवार, वांगी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो,मेथी, कोथिंबीर, भेंडी अक्षरशः बांधावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. नाशिक जिल्ह्याला यांचा सर्वाधिक फटका बसला, अशी माहिती शेतकरी नेते भरत दिघोळे यांनी दिली.
आता नवीन भाजीपाला बाजारात येण्यास अजून महिना लागेल. त्यानंतर आवक सुरळीत होईल आणि बाजार भाव स्थिर होऊ शकतात असे दिघोळे म्हणाले. एरव्ही हिवाळा सुरू झाला की भाज्या स्वस्त मिळतात, परंतु गेल्या आठवड्यात सामान्य भाज्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांत एपीएमसी मार्केट मध्ये भाजीपाल्याची आवक 30 टक्के कमी झाली. एपीएमसी भाजीपाला बाजार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बडदे म्हणाले, “ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा पाऊस पडल्याने कापणीचे नुकसान झाले. बियाणे पेरले गेले आहे पण नवीन पीक येण्यास एक महिना लागेल. डिसेंबरच्या मध्यापर्यंत, दर हिवाळ्याप्रमाणे किमती कमी होतील. तथापि, 15 डिसेंबरपर्यंत पुरवठा कमी राहील.”
किरकोळ बाजारात पालक, मेथी
आणि कोथिंबीर जुडी घाऊक बाजारात 18 ते 20 रुपये असून किरकोळ बाजारात हीच कोथिंबीर 50 रुपये जुडी तर इतर पालेभाज्या 30 रुपये जुडी विक्री केली जाते. एक किलो टोमॅटो देखील 50 रुपयांना मिळतो, जो
एका आठवड्यापूर्वी 20 रुपयांना होता. गवार 60 रुपयांवरून 120 रुपयांपर्यंत वाढली आहे, भोपळा 40 रुपये, कोबी 100 रुपये, वांगी 90 ते 100 रुपयांपर्यंत बाजारात वाढ झाली आहे. वाटाणा 150 रुपये, मिरची 60 रुपये, काकडी 60, भेंडी 80 ते 100 रुपये, फ्लॉवर 55 ते 60 रुपये, बीट 40 रुपये किलो, शेवगा 100 ते 110 रुपये किलोपर्यंत किरकोळ बाजारात विक्री होत आहे.