

मुंबई ः देशभर थंडीचे धुके दाटू लागले असतानाच हे धुके बाजूला सारून प्रदूषणाचा भेसूर चेहरा अखेर समोर आला. भारत ही जगभरातील प्रदूषणाची राजधानी ठरली आहे. जगातील सर्वांत प्रदूषित 75 शहरांपैकी तब्बल 70 शहरे एकट्या भारतात आहेत. त्यात अर्थात दिल्ली आणि मुंबई यांचा समावेश आहेच, त्यासोबतच अन्य शहरांतील हवाही श्वास घेण्यास धोकादायक असल्याचे चित्र आहे.
जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच एक्यूआयमधील शहरांची क्रमवारी जाहीर झाली असून पंजाब आणि उत्तर प्रदेशातील लहान शहरांपासून ते दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांपर्यंत भारतात प्रदूषणाने कहर केला आहे. 1013 एक्यूआय असलेले सिकतौर हे भारताचे शहर जगात सर्वांत धोकादायक ठरले आहे. बर्नाला, खैराबाद, नागली बऱ्हमपूर, फैजाबाद आणि गोरखपूर ही शहरे टॉप टेन प्रदूषित शहरांमध्ये येतात. त्यांचा एक्यूआय 500च्या पुढे आहे. जगातील सर्वांत प्रदूषित 15 शहरांमध्ये 14 शहरे भारतीय असून या यादीत तेराव्या क्रमांवर फक्त भारताबाहेरचे एकच शहर येते ते म्हणजे नेपाळचे लुंबिनी सांस्कृतिक.
राजधानी दिल्ली हे शहर श्वास घेण्यास सर्वांत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आले असून या राष्ट्रीय राजधानीच्या परिघातील गाझियाबाद, नोएडा, फरिदाबाद (जिथे गेल्याच आठवड्यात जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा तळ उघडकीस आला आणि दिल्लीसह देशभर 32 स्फोटांची मालिका घडवण्याच्या कटाचा पर्दाफाश झाला) आणि पानिपत ही शहरेही प्रदूषित हवेची शिकार झाली आहेत.
पिके कापल्यानंतर कचरा, पाचट जाळण्याचे उद्योग, अनिर्बंध बांधकामे, प्रचंड संख्येने धावणाऱ्या वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि हवामान खराब करणारे एक ना अनेक घटक यांमुळे दिल्लीचा परिसर घुसमटतो आहे. अशा दिल्लीपासून आपण दूर आहोत ते बरे आहे असे म्हणून तुम्ही सुस्कारा सोडत असाल तर तुमच्या दीर्घश्वासात तुम्ही घेतलेली हवा तुम्हाला कधी दगा देईल याची खात्री नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील प्रदूषण आता तुमच्या गावखेड्यापर्यंत पोहोचले आहे.