मुंबई : उत्तन-विरार सागरी सेतूच्या अंतिम आराखड्याला पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली असली तरी अद्याप नगरविकास विभागाची मंजुरी मिळालेली नाही. 25 ऑगस्टला हा आराखडा नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
वर्सोवा ते उत्तन असा 22 किमीचा सागरी किनारा मार्ग मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येणार आहे. तेथून पुढे उत्तन ते विरार आणि भविष्यात पालघरपर्यंतचा सागरी सेतू एमएमआरडीए बांधणार आहे. या प्रकल्पासाठी 52 हजार 652 कोटी रुपये खर्च येणार आहे. एकूण 55 किमीच्या या प्रकल्पात 24 किमी लांबीचा सागरी सेतू, 10 किमीचा उत्तन आंतरबदल मार्ग, 2.5 किमीचा वसई आंतरबदल मार्ग आणि 19 किमीचा विरार आंतरबदल मार्ग यांचा समावेश आहे.
नरिमन पॉइंट ते वरळी सागरी किनारा मार्ग, वरळी ते वांद्रे सागरी सेतू, वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू, वर्सोवा ते उत्तन सागरी किनारा मार्ग आणि उत्तन ते विरार-पालघर सागरी सेतू असे सर्व रस्ते पूर्ण झाल्यावर दक्षिण मुंबईतून थेट विरार-पालघरपर्यंत प्रवास करता येणार आहे. विरार जोडरस्ता हा एका बाजूने मुंबई-दिल्ली महामार्गाला थेट जोडला जाईल. उत्तन-विरार सागरी सेतूसाठी जायका या संस्थेकडून 72.17 टक्के तर महाराष्ट्र शासनाकडून 27.83 टक्के निधी उपलब्ध होणार आहे.
नवीन आराखडा का ?
सध्या काम सुरू असलेल्या वांद्रे ते वर्सोवा या सागरी सेतूचा विस्तार विरारपर्यंत केला जाणार होता. एमएमआरडीएने वर्सोवा ते विरार सागरी सेतूचा आराखडा तयार केला होता. मात्र त्याच वेळी महानगरपालिकेने वर्सोवा ते दहिसर, भाईंदर अशा सागरी किनारा मार्गाचे नियोजन केले. त्यामुळे एमएमआरडीएचा सागरी सेतू भाईंदरमधील उत्तन ते विरार असा बांधण्याचा निर्णय झाला. याचा नवीन आराखडा तयार करण्यात आला असून नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे.