

मुंबई : ब्रेकअप झाल्यानंतर काळाचौकी येथे भरदिवसा तरुणीवर तिचा प्रियकर चाकूने वार करीत असताना अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र जवळच कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई किरण सूर्यवंशी हेे तिच्या मदतीला धावून आले. त्यांनी तिला आरोपीच्या ताब्यातून सोडवले. रक्ताच्या थारोळ्यातून उचलून रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. सोनू बराय हा मनीषा यादव या तरुणीवर चाकूने सपासप वार करत होता. ती स्व:ताला वाचविण्यासाठी नर्सिंग होममध्ये शिरली. मात्र तेथेही आरोपीने तिच्यावर हल्ला केला. यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र कोणीही तिच्या मदतीला धावून येत नव्हते.
भायखळा वाहतूक विभागाचे रायडर पोलीस शिपाई (171281) किरण सूर्यवंशी जवळच कर्तव्यावर होते. त्यांना येथील आस्था नर्सिंग होमच्या केबिनमध्ये एक जण मुलीवर चाकूने वार करीत असल्याचे समजले. घटनेचे गांभीर्य ओळखू किरण तत्काळ घटनास्थळी गेले. मनीषाला आरोपी सोनू बराय याच्या तावडीतून सोडवून नर्सिंग होमच्या बाहेर काढले. ती गंभीर जखमी झाली होती.
सूर्यवंश यांनी तिला टॅक्सीत घालून राणीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयात नेताना ‘मुझे बचाओ मुझे हॉस्पिटल लेके चलो’ असे ती सारखे ओरडत होती. सूर्यवंशीही तिला धीर देत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले.नंतर काळाचौकीचे अधिकारी व अंमलदार यांनी पुढील उपचाराकरिता तिला जे जे हॉस्पिटलमध्ये हलवले, मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.