Mumbai Civic Water Management
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारा नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलाव आटला आहे. या तलावात 1.56 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अन्य तलावांतील पाणीसाठाही कमी झाला असून सात तलावांमध्ये सध्या 10 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राखीव कोट्यातील पाण्याने मुंबईकरांची तहान भागवावी लागणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस दाखल झाला नसल्यामुळे तलावातील पाण्याची पातळी घसरत आहे. शहराला दररोज 1850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणार्या भातसा तलावातील पाणीसाठाही कमी होत आहे.
या तलावात 7.89 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. या तलावात 7 लाख 17 हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. पण सध्या 56 हजार दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. अन्य तलावांतील पाणीसाठाही दिवसेंदिवस खालावत आहे. तानसा तलावातील पाणीसाठा 10 टक्क्यांवर आला आहे. महापालिकेने राखीव कोट्यातून पाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अप्पर वैतरणा - 3,540
मोडकसागर - 36,649
तानसा - 15,745
मध्य वैतरणा - 26,614
भातसा - 56,591
विहार - 9,199
तुळशी - 2,392
तलाव क्षेत्रात पाऊस 15 ते 20 दिवस लांबल्यास मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढावू शकते. तलावातील सध्याचे पाणी मुंबईकरांना अजून महिना ते दोन महिने पुरवण्यासाठी काही टक्के पाणीकपात करावी लागेल, असे जल अभियंता विभागातील काही वरिष्ठ अभियंत्यांचे म्हणणे आहे.