

खेड: खेड तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे. 17 गावांमधील 11 गावठाणे आणि 101 वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या वाड्या-वस्त्यांवरील 25 हजार नागरिकांना 9 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे, पाणीपुरवठा विभागाचे रमेश भोगावडे यांनी दिली.
खेड तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम विभागातील गावांना दरवर्षी मार्च महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. विहिरी, तळी, तलाव कडक उन्ह्याळ्यामुळे कोरडे पडले आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे तीन-तेरा वाजले आहेत. पाणी आणण्यासाठी लहानापासून वृद्धापर्यंत पायपीट करावी लागत आहे. जनावरे आणि शेतीलाही पाणी मिळणे कठीण झाले आहे. (Latest Pune News)
खेड तालुक्यातील वरूडे, वाफगाव, गुळाणी, कोयाळी तर्फे वाडा, वडगाव नजीक खेड, गोसासी, वाडा, बहिरवाडी, साबुर्डी, वाकळवाडी, कोहिंडे बुद्रुक, वाळद, नायफड, पूर, कनेरसर, खरोशी, तळवडे या 15 गावासह त्यांच्या 101 वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचे टँकर मागणी प्रस्ताव खेड पंचायत समितीकडे प्राप्त झाले आहेत. तालुक्यात एकूण 25 हजार 105 नागरिकांना पिण्याच्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
खेड पंचायत समितीच्या माध्यमातून 15 गावे आणि त्यांच्या वाड्या-वस्त्यांना 9 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वडगावनजीक खेड येथे सद्य:स्थितीत पाणी उपलब्ध आहे. तर तळवडे गावातील पाणी टंचाईबाबत अधिकारी वर्गाकडून तपासणी केल्यानंतर टँकर सुरू केला जाणार आहे.