सासवड: पुरंदरमध्ये उन्हाच्या कडक झळा जाणवत असल्याने तालुक्यातील धरणांचा पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. घोरवडी धरणाची एकूण साठवण क्षमता 67.50 दशलक्ष घनफूट इतकी आहे. सद्य:स्थितीत तलावात 23 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती गराडे पाटबंधारे शाखा अभियंता अविनाश जगताप यांनी दिली.
घोरवडी धरणातून दिवे प्रादेशिक योजना आहे. पाइपफुटीमुळे ही योजना बंद आहे. सध्या धरणातून सासवड शहराला पिण्याच्या पाण्याची योजना तसेच सुपे-घोरवडी, शिवतारे वस्ती, चव्हाण वस्ती, पिंपळे, पोमणनगर, दातेमळा, भिवडी याठिकाणी पाणीपुरवठा योजना सुरू आहे. या धरणावर परिसरातील 55 हेक्टर इतके क्षेत्र सिंचित होते.
मागील वर्षी एप्रिल महिन्यात घोरवडी धरणात मृतसाठा होता. मागील वर्षाच्या तुलनेत किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने या वर्षी धरणात मुबलक पाणी साठा आहे. जूनपर्यंत आसपासच्या गावांना पाण्याची टंचाई भासणार नाही, असे सासवड पाटबंधारे शाखेचे संदेशक एस. एच. कोरपडे यांनी सांगितले.
सासवड शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याचे सासवड नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवंशी यांनी सांगितले.सासवड शहराला घोरवडी धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे, असे घोरवडी जलाशय पाणी पुरवठा समिती अध्यक्ष विश्वास काटकर यांनी सांगितले.
सध्या सासवड शहराला घोरवडी आणि वीर धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. नागरिकांनी टंचाई स्थिती लक्षात घेऊन पाण्याची काटकसर करावी.
डॉ. कैलास चव्हाण, सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी