कांदिवली, शताब्दी रुग्णालयात पॅरामेडिकल नोंदणीविरोधात बंड file photo
मुंबई

Paramedical Council rules : कांदिवली, शताब्दी रुग्णालयात पॅरामेडिकल नोंदणीविरोधात बंड

12 लॅब तंत्रज्ञ ठाम; रुग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महापालिका रुग्णालयांमध्ये कायदे आणि शासकीय नियम केवळ कागदावरच उरल्याचे चित्र समोर आले आहे. कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलच्या अनिवार्य नोंदणी आदेशांविरोधात उघड बंड सुरू असून, किमान 10 ते 12 लॅब तंत्रज्ञ नोंदणी करण्यास ठामपणे नकार देत आहेत. या गंभीर प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शासकीय निर्देशांचे उल्लंघन करत काही माजी कायमस्वरूपी लॅब तंत्रज्ञ नोंदणी प्रक्रियेला विरोध करत असून, यामुळे रुग्णालय प्रशासन आणि वैद्यकीय अधीक्षकांची विश्वासार्हता देखील धोक्यात आली आहे. पात्रता आणि नोंदणी अपूर्ण असताना रुग्णांची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

ॲड. तुषार भोसले यांनी ‌‘आपलं सरकार‌’ पोर्टलवरून महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. तक्रारीची दखल घेत कौन्सिलने शताब्दी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना तातडीची कारवाई करण्याचे आदेश दिले आणि सर्व लॅब तंत्रज्ञांची नोंदणी बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या आदेशांनंतरही संबंधित तंत्रज्ञ उघडपणे विरोध करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समजते. काही तंत्रज्ञांनी लेखी आक्षेप सादर केल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्याची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

संशयास्पद भरती पुन्हा चर्चेत

2008 पासून झालेल्या नियुक्त्यांच्या फाईल्स पुन्हा तपासण्यात आल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. सरकारी डीएमएलटी पात्रता अनिवार्य असतानाही रुचिरा वाघ आणि श्रद्धा दरेकर या दोन तंत्रज्ञांची रक्तपेढीत नियुक्ती करण्यात आल्याचे उघड झाले आहे. पात्रता नसल्यामुळे एफडीएने आक्षेप घेतल्यानंतर त्यांना रक्तपेढीतून काढून प्रयोगशाळेत हलवण्यात आले. आज हाच पात्रतेचा अभाव त्यांच्या पॅरामेडिकल कौन्सिल नोंदणीस मोठा अडथळा ठरत आहे. अशाच प्रकारची परिस्थिती सुमारे 10 इतर तंत्रज्ञांचीही असल्याचे समजते.

अधिक्षकांनी सांगूनही नोंदणीकडे दुर्लक्ष

22 जानेवारी 2026 रोजी दिलेल्या निवेदनात वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय गुप्ता यांनी सांगितले की, रुग्णालयातील नियमित व कंत्राटी लॅब तसेच एक्स-रे तंत्रज्ञांना नोंदणी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. ज्यांनी अद्याप प्रक्रिया सुरू केलेली नाही, त्यांना स्मरणपत्रे पाठवण्यात आली असून प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT