मुंबई

Union Budget 2026 | केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला किती निधी मिळाला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

CM Devendra Fadnavis on Union Budget 2026 | वाढते शहरीकरण झालेल्या महाराष्ट्राला अर्थसंकल्पातील योजनांचा होणार विशेष फायदा

पुढारी वृत्तसेवा

CM Devendra Fadnavis on Union Budget 2026

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा, निधी आणि गती देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, असे स्पष्ट करत केंद्रीय अर्थसंकल्‍पात महाराष्‍ट्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्‍यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

शहरांच्या सर्वांगीण विकासाला मिळणार चालना

केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या टियर II आणि टियर III शहरांमधील विकास केंद्रांना बळकटी देण्यासाठी अनेक प्रमुख पायाभूत सुविधा उपक्रमांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य आहे. या योजनेचा महाराष्ट्राला मोठा लाभ होणार आहे. महाराष्ट्रात ५ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांची संख्या अधिक आहे. आता या शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. दहा वर्षांपूर्वी या क्षेत्रात आपण केवळ १ लाख कोटी रुपयांची तरतूद करत होतो, यावरून याचे महत्त्व स्पष्ट होते. तसेच अर्थसंकल्पात महिला नेतृत्व करतात अशा उद्योगांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येणार आहे. महिला आणि शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्राला मिळणार मोठा निधी

मुंबई-पुणे हायस्पीड कॉरिडॉरमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार. यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १ लाख कोटींचा निधी मिळणार आहे. तसेच विविध योजनांमधून मोठा निधी मिळाला आहे. आपण तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वेगवान वाटचाल करणार आहोत. विविध योजनांमध्ये शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसायालाही चालना मिळणार आहे. विकसित भारताकडे नेणाऱ्या या अर्थसंकल्पातील विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT