मुंबई

Uddhav Thackeray | "प्रचंड पैशाच्या धबधब्यासमोर..." : उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

भाजपने कागदावर शिवसेना संपवली असेल; पण जमिनीवरची शिवसेना संपवू शकत नाही

पुढारी वृत्तसेवा

Uddhav Thackeray on BMC Election Result

"सत्ताधाऱ्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही यश 'शिवशक्ती'ने मिळवले आहे, त्याने सत्ताधारी पक्षाला घाम फोडला आहे. भाजपने कागदावर शिवसेना संपवली असेल; पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाहीत. हे महापालिका निकालांनी दाखवून दिले आहे. भाजप हा पक्ष कागदावर आहे, जमिनीवर नाही. तो जमिनीवर असता, तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता. साध्या शिवसैनिकांनी प्रचंड पैशाच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी ताठ मानेने लढू शकते, हे दाखवून दिले आहे," अशा शब्दांमध्ये शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि. १७) पत्रकार परिषदेत मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालावर भाष्य केले. "त्यांचा विजय डागाळलेला आहे. ज्याच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत, त्यांना लाज वाटली पाहिजे. मी मधल्या काळात भाजपला 'ॲनाकोंडा' म्हणालो होता. मला माझ्या शिवसेनेचा अभिमान आहे," असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "सर्वच महापालिकांच्या प्रचाराला मी जाऊ शकलो नाही. मी जेमतेम मुंबई, ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिकांच्या प्रचाराला गेलो होतो. चंद्रपूरमध्ये सुद्धा शिवसेनेचे चांगले नगरसेवक निवडून आले आहेत. परभणीमध्ये शिवसेनेने उत्तम यश प्राप्त केले आहे. मी जाऊ शकलो नाही त्या सर्व शिवसैनिकांची आणि मतदारांची दिलगिरी व्यक्त करतो. अगदी 'चांदा ते बांदा' शिवसेना आणि शिवशक्ती - म्हणजेच शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीला मतदान केले आहे, त्या सर्व मतदारांना आणि तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो."

सत्ताधारी पक्षाने अत्यंत घाणेरड्या पद्धतीने निवडणूक लढवल्या

राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका सत्ताधारी पक्षाकडून अत्यंत घाणेरड्या पद्धतीने लढवल्या गेल्या. जणू काही प्रत्येक निवडणूक ही त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे, अशा पद्धतीने त्यांनी 'साम-दाम-दंड-भेद' या पलीकडे जाऊन सर्व गोष्टींचा वापर केला. अफाट पैशाची लालूच दाखवली, आमिषं दाखवली. आमच्या काही शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटिसा दिल्या, काही जणांना अटक करण्यात आली. काही ठिकाणी दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले. ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील आमच्या उमेदवारांना पैशांची आमिषं देण्यात आली. काही ठिकाणी जोर-जबरदस्तीने त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली. या सगळ्या गुंडगिरीला न डरता ज्या उमेदवारांनी ही लढत दिली आणि ज्या मतदारांनी निर्भयपणे मतदान केले, ते सर्वजण खरोखर लोकशाहीचे रक्षक आहेत, असेही ते म्हणाले.

आम्ही सत्ताधारी पक्षाला घाम फोडला

मुंबईमध्ये आमचा महापौर व्हावा, अशी आमची इच्छा होती आणि आजही आहे. तो आकडा आम्ही आज गाठू शकलेलो नाही, पण सत्ताधाऱ्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही यश 'शिवशक्ती'ने मिळवले आहे, त्याने सत्ताधारी पक्षाला घाम फोडला आहे. त्यांनी एक्झिट पोलचे आकडे असोत किंवा इतर प्रयत्न, शिवसेना नामोहरम करण्यासाठी एकही कसर सोडली नाही.

मला एका गणिताचे उत्तर मिळालेले नाही

"मला एका गणिताचे उत्तर मिळालेले नाही. मोदीजींची सभा शिवतीर्थावर झाली होती, तेव्हा खुर्च्या रिकाम्या होत्या. याही वेळेला आमची सभा झाली, मी आणि राज (ठाकरे) सर्वप्रथम शिवाजी पार्कला एकत्रित आलो. साक्षात शिवाजी पार्क कसं फुलून गेलं होतं! दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत खुर्च्यांचीच गर्दी दिसत होती. आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान होत नाही, पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात, हे आम्हाला पहिल्यांदा कळलं. खुर्च्या मतदान कशा करू शकतात, हे एक न सुटलेले कोडे आहे," असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मुंबईची जमीन मुंबईकरांसाठीच वापरली जाईल

मी मुंबईकरांचे आभार मानतो. आमची अपेक्षा अधिक होती, कारण गेली २५ वर्षे आम्ही सेवा केली, कोविड काळात 'मुंबई मॉडेल'ची जगभर प्रशंसा झाली. मला वाटले होते की मुंबईकर अधिक भरघोस आशीर्वाद देतील. तरीही, शिवसेनेचे जे गड आहेत, तिथल्या मराठी माणसाने शिवसेनेवरील आपला आशीर्वादाचा हात तसाच ठेवला आहे. आता महापालिकेत शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गेल्यानंतर, मुंबई महापालिकेची तिजोरी यांनी कशी लुटली याचा भांडाफोड नक्कीच होईल. आम्ही जो वचननामा जनतेसमोर ठेवला आहे, त्याचा पाठपुरावा करू. मुंबईची जमीन मुंबईकरांसाठीच वापरली जाईल, हे दडपण आम्ही मुंबई लुटणाऱ्यांवर सदैव ठेवू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी मुंबईकरांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT