

Davendra Fadnavis On Uddhav Thackeray: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवरून राजकारण चांगलेच तापले असून, आता या वादाचे पर्यवसान अत्यंत खालच्या स्तरावरील वैयक्तिक आरोपांमध्ये झाले आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आई वडील हिंदू आहेत का असा प्रश्न उपस्थित केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. यावर फडणवीसांनीही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं आहे.
'पुढारी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. ठाकरे म्हणाले, "मी म्हणतो मुंबईचा महापौर मराठी असेल, तर फडणवीस म्हणतात महापौर हिंदू असेल. म्हणजे त्यांना मराठी माणूस हिंदू वाटत नाही का? देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही, याचे मला आश्चर्य वाटते. त्यांचे आई-वडील हिंदू होते की नव्हते? त्यांनी स्वतःचा जन्मदाखला तपासून पाहावा. मराठी माणसाला हिंदू न मानणारी ही कसली मगरुरी?" छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देत त्यांनी फडणवीसांच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
उद्धव ठाकरेंच्या या विधानाचा समाचार घेताना फडणवीस भावूक आणि आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शिवतीर्थावर झालेल्या भाषणावेळी त्यांनी "आई-वडिलांपर्यंत पोहोचताना तुम्हाला लाज वाटायला हवी होती. मला अभिमान आहे की मी अशा बापाचा मुलगा आहे जो संघाचा प्रचारक होता आणि ज्याने आणीबाणीत दोन वर्षे तुरुंगवास भोगला. माझ्या वडिलांनी कधी संपत्ती कमावली नाही, पण आज त्यांना स्वर्गातून आनंद होत असेल की त्यांचा मुलगा त्यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेतोय," असे उत्तर फडणवीसांनी दिले.
फडणवीस पुढे म्हणाले की, "आज जेव्हा तुमचे वडील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वर्गातून तुम्हाला पाहत असतील, तेव्हा त्यांना काय वाटत असेल? माझा मुलगा आज 'रशीद मामू' सोबत बसतोय हे पाहून त्यांना नक्कीच यातना होत असतील."
मुंबईच्या महापौरपदावरून सुरू झालेला हा वाद आता अस्मिता आणि हिंदुत्वाच्या पलीकडे जाऊन थेट कुटुंबापर्यंत पोहोचल्याने येणाऱ्या काळात मुंबईतील राजकीय वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.