Raj Thackeray and Uddhav Thackeray file photo
मुंबई

Raj Thackeray and Uddhav Thackeray: शिवसेना भवनात ठाकरे बंधूंनी केला 'संयुक्त वचननामा' प्रकाशित; महायुती सरकारवर हल्लाबोल

MNS- UBT Manifesto Mumbai Municipal Corporation election : शिवसेना भवन येथे उद्धव व राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी दोन्ही बंधू संयुक्त वचननामा प्रकाशित करून निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत.

मोहन कारंडे

Raj Thackeray and Uddhav Thackeray MNS- UBT Manifesto

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच आज (दि. ४) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू संयुक्त वचननामा प्रकाशित केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेला नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी काही दिवसांचाच अवधी उरला असतानाच 'ठाकरे बॅण्ड' प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. आज शिवसेना भवन येथे उद्धव व राज ठाकरे यांनी दोन्ही पक्षांचा संयुक्त वचननामा जाहीर केला. या वचननाम्यामध्ये मुंबईकरांना पायाभूत सुविधा, वाहतूक, स्वच्छता, मराठी माणसाचे प्रश्न, महापालिकेतील प्रशासनातील पारदर्शकता, हिंदुत्व आदी मुद्यांवर ठोस आश्वासने दिली आहेत.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना निलंबित करावं : उद्धव ठाकरे

आज शिवसेना भवन येथे उद्धव व राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, २० वर्षानंतर आम्ही दोघे भाऊ शिवसेना भवनात एकत्र आल्याचा आनंद आहे. शिवशक्तीचा वचननामा प्रसिद्ध करत आहे. देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू आहे. मतचोरी पकडल्यानंतर साम, दाम, दंड, भेद, वापरून उमेदवारांची पळवा-पळवी सुरू असल्याचे ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात, राहुल नार्वेकर यांच्याकडे निपक्षपातीपणा नाही. त्यांना तत्काळ निलंबित करावे. त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणुकीमध्ये दमदाटी सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध करून मतदारांचा हक्क हिरावला आहे. निवडणूक आयोगाने अशा ठिकाणची निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली. मी सत्तेत असताना मराठी सक्तीची केली, तो आदेश महायुती सरकाने रद्द केला. हिंदू धोक्यात आला आहे, हा १० वर्षातील परिपाक आहे. आम्ही हिंदी नाही, हिंदू आहोत. पंतप्रधान मोदी १० वर्ष सत्तेत असताना हिंदू संकटात कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे काय म्हणाले ?

पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मला २० वर्षानंतर जेलमधून सुटून आल्यासारख वाटत आहे. नवीन शिवसेना भवन पहिल्यांदाच पाहत आहे. जुन्या शिवसेना भवनातील आठवणी रोमांचक असल्याचे त्यांनी सांगितलं.

भाजपला सत्तेतून बाहेर येणार नाही, असा भ्रम असेल तर तो दूर करावा. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेलं नाही. पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुकीला भाजपने विरोध केला होता, आता राज्यात ज्या जागा बिनविरोध झाल्या आहेत, त्यावर भाजपने आपली प्रतिक्रिया द्यावी. सत्ताधाऱ्यांनी नवीन पायंडा पाडू नये, असे राज ठाकरे म्हणाले.

मुंबईचा महापौर मराठीच होणार

"पेशव्यांच्या काळात तीन सस्थाने निर्माण झाली. बडोद्याच साम्राज्य मराठ्यांचं पण तिथं गुजराती महापौर कसे? असा सवाल करत मुंबईचा महापौर मराठीच होणार असल्याचा पुनरूच्चार राज ठाकरे यांनी केला.

युतीचा प्रचार 'संयुक्त ठाकरे शैली'त होणार

५ जानेवारीपासून प्रचाराचा बिगुल वाजणार असून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे या युतीचा प्रचार 'संयुक्त ठाकरे शैली'त होणार आहे. उद्धव व राज यांच्या मुंबईत तीन सभा होणार आहे. पहिली पूर्व उपनगरात, दुसरी पश्चिम उपनगरात आणि समारोप सभा मुंबई शहरात होणार आहे. ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांनी मुंबईत प्रचाराचा धुरळा उडणार असून त्यांच्या सभेसाठी दोन्ही पक्षांतील नेत्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. या सभांमधून ठाकरे थेट मराठी माणसांच्या भावनांना हात घालत त्यांना मराठी माणसाच्या एकजूटीसाठी साद घालतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT