मुंबई: विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली, ती अत्यंत धक्कादायक होती. विद्यार्थ्यांवर खिळे लावलेल्या काठ्यांनी हल्ले करण्यात आले, पॅलेट गनचा वापर झाला, या चुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आहेत.
त्यांच्या या चुकांमुळे विद्यार्थ्यांवर बोलण्याची ही वेळ आली. आता या चुकांबद्दल मोदी हे विद्यार्थ्यांची कधी माफी मागणार, असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री, त्यांना शिवीगाळ करणाऱ्या आंदोलक तरुणांना माफ केल्याचे एका व्हिडीओद्वारे म्हटले होते. यावरून उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. तुम्ही आधी या मुलांना झुरळ म्हटले, त्यांना भरकटलेले म्हटले.
आता सांगताय की माफ केले, पण ही मुले तुम्हाला माफ करतील का? आपण जेव्हा आंदोलक विद्यार्थ्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा कुणाचे हात तर कुणाचे पाय फ्रॅक्चर झाले होते. एका तरुणीने उद्वेगाने सांगितले की, तिचे कपडे फाडले गेले. त्या मुलांनी जे भोगले आहे, ते ऐकूनच अंगावर शहारे येत होते, असे ठाकरे म्हणाले.
काही विद्यार्थिनींशी गैरवर्तन झाल्याचे व्हिडीओ समोर आले. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचीही सरकारने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. माफ करण्याची नाही तर माफी मागण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांची मागणी केवळ शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची होती. सरकारने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता तर हा संघर्ष टाळता आला असता. मात्र सरकारला अतिरेक्यांशी किंवा पाकिस्तानशी बोलायला हरकत वाटत नाही; पण स्वतःच्या देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची तयारी दिसली नाही, असा आरोप त्यांनी केला.
लोकमान्यांना ‘असंतोषाचे जनक’ म्हटले जाते. कारण त्यांनी ब्रिटिशांविरोधात असंतोष निर्माण केला होता. पण या सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्याच विरोधात असंतोष निर्माण केला आहे. त्यामुळे हे सध्याचे राज्यकर्ते स्वतःच्याच असंतोषाचे जनक आहेत, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.