शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे.  Pudhari
मुंबई

Uddhav Thackeray: बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; निवडणूक आयोगातील मतभेद उघड झाल्यावर उद्धव ठाकरे आक्रमक

आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्‍याचीही केली मागणी

पुढारी वृत्तसेवा

Uddhav Thackeray press conference

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आम्ही विरोधी पक्ष सातत्याने निवडणूक आयोगाच्या मनमानी आणि विचित्र कारभारावर बोलत आहोत. आता तर दोन निवडणूक आयुक्तांनीच ही बाब समोर आणली आहे. एक टोळी निवडणूक आयोग टोळीप्रमाणे चालवत आहे, असा गंभीर आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना अटक करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि. २३ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत केली.

यामागील सूत्रधार समोर यायला हवा

निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांसह आदेशांवर तब्बल १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले. यातील चार आक्षेप एकाच दिवशी नोंदवण्यात आले, असे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. याबाबत बोलताना केंद्रीय गृह खाते निवडणूक आयोग चालवत असल्याचं समोर आले आहे. आता यामागील सूत्रधार कोण आहे, तेही समोर यायला हवं.

आमचं चिन्ह गद्दारांना दिलं

शिवसेना चिन्ह हे कोणतीही तपासणी न करता गद्दारांना दिलं गेलं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीतही हेच झालं. आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या बाबतीतही हेच घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराबाबत आम्ही आवाज उठवत आहोत, असेही ठाकरे म्हणाले.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना अटक करा

निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराबाबत आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. सत्तेची हाव असणारे आणि त्यातून लोकशाहीचा खून करणाऱ्या ज्ञानेश कुमार यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

सर्वांनी एकत्रित येऊन लढलं पाहिजे

आता निवडणूक आयोगाचा कारभार सर्वांसमोर आला आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन आता लढले पाहिजे. देशाचे डोळे उघडले पाहिजेत. आज मी सगळ्या विरोधी पक्षांना निमंत्रण देत आहे. निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराविरोधात सर्वांनी एकत्रित येऊन लढा उभारावा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या

निवडणूक आयोगाकडून होत असलेला गैरकारभार समोर आला आहे. आता जनता रस्त्यावर उतरली पाहिजे, सरकारने पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या गैरकारभारावर संपूर्ण देश एकत्र येईल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयुक्त निवडणाऱ्यांच्या घरचं पाणी भरणारच

निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांवर आक्षेप घेतले आहेत. आता सरकारच्या मर्जीने निवडलेला निवडणूक आयुक्त, आयुक्त निवडणाऱ्यांच्या घरचं पाणी भरणारच, असा टोलाही त्यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT